अधिकाऱ्यांविना संजय गांधी निराधार योजना ठरली निराधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:42 AM2021-02-17T04:42:01+5:302021-02-17T04:42:01+5:30
तुमसर : निराधारांना तत्काळ आधार देण्याकरिता शासनाने संजय गांधी निराधार व इतर योजना सुरू केल्या आहेत; परंतु सदर योजनेकरिता ...
तुमसर : निराधारांना तत्काळ आधार देण्याकरिता शासनाने संजय गांधी निराधार व इतर योजना सुरू केल्या आहेत; परंतु सदर योजनेकरिता स्वतंत्र नायब तहसीलदार यांची नियुक्ती मात्र भंडारा जिल्ह्यात कुठेच केली नाही. नियमित नायब तहसीलदारांकडेच प्रभार देण्यात आला आहे. जवळच्या गोंदिया जिल्ह्यात मात्र या योजनेकरीता स्वतंत्र नायब तहसीलदारांची नियुक्ती केकेली आहे, हे विशेष आहे.
शासनामार्फत संजय गांधी निराधार योजना राबविली जाते. यासोबत अन्य योजनाही राबविल्या जातात. याकरिता राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र नायब तहसीलदारांची नियुक्ती केली आहे. परंतु भंडारा जिल्ह्यात एकाही तालुक्यात स्वतंत्र नायब तहसीलदारांची नियुक्ती या योजनेकरिता करण्यात आली नाही. त्यामुळे नियमित नायब तहसीलदारांकडे या योजनेचा प्रभार देण्यात आला आहे. नियमीत नायब तहसीलदारांकडे कामाच्या मोठा व्याप असतो. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना तथा अन्य योजनांच्या लाभार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे निराधारांची अनेक प्रकरणे प्रलंबित राहतात. अनेक महिने त्यांना लाभच मिळत नाही.
तुमसर तालुक्यासह इतर तालुक्यांतही निराधारांची मोठी संख्या आहे. या योजनेत लाभ मिळावा याकरिता लाभार्थ्यांना आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. योजनेचा लाभ तत्काळ मिळावा हा त्यांचा उद्देश असतो. परंतु या ठिकाणी या योजनेला अधिकारीविना खीळ बसत आहे. जवळच्या गोंदिया जिल्ह्यात मात्र संजय गांधी निराधार योजनेकरिता स्वतंत्र नायब तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातही प्रत्येक जिल्ह्यात या योजनेकरिता स्वतंत्र नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु केवळ भंडारा जिल्ह्यात स्वतंत्र नायब तहसीलदार यांची नियुक्ती का करण्यात आली नाही हे मात्र एक न उलगडणारे कोडेच आहे.
बॉक्l .
तुमसर येथे दोन नायब तहसीलदारांची पदे रिक्त :
तुमसर येथे एकूण तीन नायब तहसीलदारांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी दोन पदे रिक्त आहेत. एका नायब तहसीलदारांचे येथून स्थानांतरण झाले तर दुसरे नायब तहसीलदार मागील महिन्यात सेवानिवृत्त झाले. सध्या केवळ एकच नायब तहसीलदार येथे कार्यरत आहेत. तहसीलदार व नायब तहसीलदार असे दोनच अधिकारी आता तालुक्याच्या कारभार सांभाळत आहेत.
कोट
तुमसर येथे संजय गांधी निराधार योजनेकरिता स्वतंत्र नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. नियमित नायब तहसीलदार यांचेकडे संजय गांधी निराधार योजनेची कामे सोपविण्यात आली आहेत.
- बी. डी. तेळे, तहसीलदार, तुमसर.