रांगोळीशिवाय दिवाळी सण अपूर्ण
By Admin | Published: October 30, 2016 12:35 AM2016-10-30T00:35:22+5:302016-10-30T00:35:22+5:30
रांगोळी मांगल्याचं प्रतीक. प्रत्येक सुखद आणि घराच्या अंगणात रांगोळीचे वास्तव्य लक्षवेधक असते.
आज लक्ष्मी पूजन : दिव्यांच्या प्रकाशाइतकाच आनंद-ऊर्जेचा स्रोत
रविंद्र चन्नेकर बारव्हा
रांगोळी मांगल्याचं प्रतीक. प्रत्येक सुखद आणि घराच्या अंगणात रांगोळीचे वास्तव्य लक्षवेधक असते. दिवाळीच्या सणाला तर घरी येणाऱ्या लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिव्याची आरास विविध रंगानी नटलेली अंगणातील मनमोहक रांगोळी दिव्यांच्या उर्जेइतकेच आनंदाच स्त्रोत बहाल करीत असते.
घराच्या अंगणातील रांगोळी ही घराचा आरसा समजल्या जाते. मनमोहक, आकर्षक रांगोळी काढण्यासाठी आपले कसब पणाला लावतात. बाजारातील विविध रंगांनी सजलेली रांगोळीची दुकाने पाहून मन मोहरुन जाते. दिवाळीच्या आठवडाभर आधीपासूनच रांगोळी खरेदीसाठी महिलांची या दुकानावर झुंबड दिसून येते. लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी, केशरी, निळा, जांभळा, मोरपंखी, काळा आणि महत्वाचा रंग पांढरा अशा विविध २० ते २५ रंगाच्या रांगोळीचा विक्रमी खप होत असतो.
मागील काही वर्षापासून रांगोळीतही अनेक प्रकार आले आहेत. स्टिकरच्या रांगोळीचे फॅडही निघाले आहे. यात रंगाचा वापर न करता हे रांगोळीचे स्टिकर घरांच्या अंगणात, घरासमोर चिटकविल्या जाते. राजस्थान, गुजरात या भागातून मिळणाऱ्या पांढऱ्या चिनीमातीपासून बनविलेली रांगोळी बाजारात विक्रीस आणली जाते. पाहिजे तो रंग टाकून ही पांढरी माती रॉकेल मिश्रीत केल्यावर रांगोळीची निर्मिती होते.
रांगोळीचा व्यवसाय हा हंगामी असून या व्यवसायात आता अनेक बेरोजगार उतरले आहेत. पांढऱ्या रांगोळीशिवाय इतर रंगाच्या रांगोळीला फारशी मोजणी नसल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होतो, असे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले.
रांगोळी ही किलोने, मापाने सुद्धा विकली जाते. हे माप पाच रुपयापासून दहा रुपयापर्यंत असते. गेल्या काही वर्षापासून सणासुदीला अंगणात संस्कार भारतीची रांगोळी काढल्याचे फॅड वाढले आहे.
बदलत्या जीवनशैलीनुसार आणि महिला व युवतीच्या पसंतीनुसार रांगोळीच्या डिझाईनमध्ये नेहमीच नाविण्य पाहावयास मिळते. तांदळाची रांगोळी, पाण्याखालची रांगोळी, चटईची रांगोळी असे अनेक प्रकारची दिवाळीमध्ये वापरल्या जातात.
भारतीय संस्कृतीत सणवार आणि रांगोळी हे मांगल्याचे प्रतिक समजले जात असून आनंदाच्या क्षणाला रांगोळीची किनार असतेच.