मृतकाची नोंदविली साक्ष !

By admin | Published: June 28, 2016 12:36 AM2016-06-28T00:36:12+5:302016-06-28T00:36:12+5:30

वारसान हक्काप्रमाणे वडिलोपार्जित जमीनीवर नाव चढविण्याच्या प्रक्रियेत मोठ्या मुलाचे नाव वगळण्यासाठी मृत पावलेल्या आईला गैरअर्जदार बनवून त्यांची साक्ष घेण्यात आली.

Witness of the deceased! | मृतकाची नोंदविली साक्ष !

मृतकाची नोंदविली साक्ष !

Next

आरोप : तहसीलदार, तलाठी, मंडळ निरीक्षकांच्या कार्यवाहीवर संशय
भंडारा : वारसान हक्काप्रमाणे वडिलोपार्जित जमीनीवर नाव चढविण्याच्या प्रक्रियेत मोठ्या मुलाचे नाव वगळण्यासाठी मृत पावलेल्या आईला गैरअर्जदार बनवून त्यांची साक्ष घेण्यात आली. एवढेच नव्हे तर चक्क फेरफारही करण्यात आल्याचा प्रताप भंडारा तहसील कार्यालयात उघडकिला आला आहे. तहसीलदार, तत्कालीन तलाठी, तत्कालीन मंडळ निरिक्षक यांच्यावर कारवाईचा आरोप महेशकुमार चिर्वतकर (रा. राजनांदगाव) यांनी केला आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी चिर्वतकर यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, महेशकुमार चिर्वतकर यांचे वडील स्व.गोविंदराव चिर्वतकर यांची वडिलोपार्जित जमीन कारधा तथा गिरोला येथे आहे. गोविंदरावांचा १९ जानेवारी १९९१ मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मोठा मुलगा महेशकुमार चिर्वतकर यांचे नाव वारसानाप्रमाणे चढविण्यात आले नाही. यासंदर्भात १७ मार्च १९९३ मध्ये गोविंदराव यांची पत्नी सुंदरबाई चिर्वतकर, मुलगा कृष्णराव, राजेशकुमार व आभा चिर्वतकर यांची नावे चढविण्यात आली. यादरम्यान मोठा मुलगा महेशकुमार यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी आपल्यापरीने कार्यवाही केली. परिणामी वारस म्हणून महेशकुमार यांचे नाव फेरफार क्रमांक ११६ वर नोंदविण्यात आले. याचवेळी त्यांचे भाऊ राजेशकुमारने आक्षेप घेतल्यामुळे राजस्व निरिक्षक मंडळाने वादग्रस्त प्रकरण तहसीलादारांकडे निर्णयार्थ पाठवावे, असा शेरा दिला. या कालावधीत तलाठी कार्यालयातून १९९३ ची वादग्रस्त नोंद गायब झाली आहे. यानंतर महेशकुमार मुळ दस्तऐवज यांनी मागितल्यावही त्यांना देण्यात आले नाही.
१४ एप्रिल २००७ ला सुंदरबाई चिर्वतकर यांचा मृत्यू झाला. मात्र मृत पावलेल्या सुंदरबाई यांची साक्ष सदर प्रकरणात नोंदवून १९९३ ला झालेल्या फेरफारची नोंद रद्द (निरस्त) करण्यात आली. या आशयाचा आदेश तहसीलदारांनी २८ मे २०१४ दिल्याचा आरोपही महेशकुमार चिर्वतकर यांनी केला. संपत्तीवरील माझा अधिकार डावलून स्व:तच्या फायद्यासाठी केलेल्या कारवाईची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील करण्यात आल्याची माहिती आहे.
वृत्ताच्या माध्यमातून न्यायालयीन प्रक्रियेवर ताशेरे ओढणे हा आमचा हेतू नाही. पंरतु गोविंदराव चिर्वतकर यांच्या मृत्युनंतर जमीनीच्या वारसानमध्ये सर्वात प्रथम अधिकृतपणे सुंदरबाई यांचे नाव चढले, तर २८ मे २०१४ ला तहसीलदारांच्या आदेशापर्यंत सुंदरबाई यांचा मृत्यू झाला आहे, ही बाब का लपविण्यात आली, हा महत्वाचा मुद्दा आहे. वेळोवेळी मुलांची साक्ष नोंदविण्यात येते, मात्र पतीच्या मृत्युनंतर मुख्य वारसान म्हणून नाव असलेल्या सुंदरबाई चिर्वतकर यांची साक्ष व उपस्थितीबाबत महसुल प्रशासनाने का विचारणा केली नाही? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. (प्रतिनिधी)

चिर्वतकर यांच्या प्रकरणात आमच्याकडे उपलब्ध दस्तऐवजात सुंदरबाई यांची साक्ष असल्याची नोंद नाही. त्या हयात आहे की नाही, याची नोंद उपलब्ध करून दिलेली नाही. प्रकरण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करण्यात आले आहे.
- सुशांत बनसोडे,
तहसीलदार भंडारा

Web Title: Witness of the deceased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.