लाखांदूर तालुक्यातील गावांमध्ये पुन्हा लांडग्यांचा धुमाकूळ, गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्या केल्या ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 06:02 PM2023-08-10T18:02:25+5:302023-08-10T18:03:16+5:30
रात्रीच्या सुमारास लांडग्यांचा शिकारीच्या शोधात जंगलातून भटकत गावात प्रवेश
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात जंगलातून गावात प्रवेश केलेल्या लांडग्याने घरालगतच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला चढवीत एक शेळी व बोकड ठार केल्याची घटना घडली. ही घटना १० ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथे उघडकीस आली. या घटनेत तुलाराम ढेकलू बावनकर (नांदेड) या पशुपालकाच्या जवळपास २० हजार रुपयांच्या शेळ्यांचा मृत्यू झाल्या.
घटनेच्या आदल्या दिवशी सायंकाळच्या सुमारास पीडित पशुपालकाने शेळ्या घरालगतच्या गोठ्यात बांधून ठेवल्या होत्या. दरम्यान, रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात जंगलातून भटकत गावात प्रवेश केलेल्या लांडग्यांनी घरालगतच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात लांडग्यांनी १ शेळी व १ बोकड ठार केला. सकाळच्या सुमारास घटनेतील पीडित पशुपालक शेळ्यांना सोडण्यासाठी गोठ्यात गेला असता त्याला १ शेळी व १ बोकड मृत अवस्थेत दिसून आली. या घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला दिली. वनपरिक्षेत्राधिकारी रूपेश गावित यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक जी.डी. हात्थे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.