लवारीत गॅस सिलिंडरच्या स्फोटात महिला गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2023 06:47 PM2023-04-30T18:47:14+5:302023-04-30T18:47:36+5:30
उपचारार्थ नागपूरला हलविले
साकोली (जि. भंडारा): घरगुती गॅसचा सिलिंडरचा स्फोट होऊन एक महिला गंभीररित्या भाजल्याची घटना साकोली तालुक्याच्या लवारी येथे १० वाजेच्या सुमारास घडली. यात कोमल गौरीशंकर पांडे (३२) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना उपचारार्थ नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे.
लवारी येथील गौरीशंकर पांडे यांच्या पत्नी कोमल गौरीशंकर पांडे (३२) या घराजवळील अंगणवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वयंपाक तयार करतात. नित्याप्रमाणे त्यांनी स्वयंपाक तयार करून सकाळी ९ वाजेदरम्यान अंगणवाडीत पोहोचविला. त्यानंतर त्या घरी परत आल्या. दार उघडून स्वयंपाकघरात येताच अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता, की त्यात कोमल पांडे या ९५ टक्के भाजल्या. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या मदतीने ताबडतोब त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूर येथे हलविण्यात आले.
या स्फोटात घरातील कपडे, धान्य, सोफा, टीव्ही, फ्रीज, स्वयंपाक खोलीतील | संपूर्ण सामान जळून खाक झाले. गौरीशंकर पांडे यांच्या कुटुंबात पत्नी कोमल यांच्याबरोबरच मुलगा कुणाल व मुलगी शेजल असा परिवार आहे. या स्फोटात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य अनिल किरणापुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले व मदत केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"