उपचाराअभावी महिलेचा मृत्यू
By Admin | Published: May 12, 2016 12:41 AM2016-05-12T00:41:23+5:302016-05-12T00:41:23+5:30
उच्च रक्तदाब वाढून श्वसनाचा त्रास जाणवल्यामुळे एक महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता गेली.
नाकाडोंगरीतील प्रकार : आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
मोहन भोयर तुमसर
उच्च रक्तदाब वाढून श्वसनाचा त्रास जाणवल्यामुळे एक महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता गेली. उपचार करणारे डॉक्टर उपस्थित नव्हते तथा इन्व्हर्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने तिच्यावर उपचार झाले नाही. परिणामी महिला परत जाताना तिचा मृत्यू झाला.
मृतक महिलेचे नाव कल्पना भीमराव नांदगावे (४७) रा.पाथरी असे आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी घडली. या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले तथा सामाजिक कार्यकर्ता ठाकचंद मुंगुसमारे यांनी केली आहे.
कल्पना नांदगावे व त्यांच्या मुलगा ग्रा.पं. सदस्य गौरव नांदगावे (३०) नाकाडोंगरी येथील आठवडी बाजाराकरिता आले होते.
कल्पनाला श्वसनाचा त्रास वाढून उच्च रक्तदाब वाढल्याचे जाणवले. त्यामुळे गौरव यांनी आईस प्राथमिक आरोग्य केंद्र नाकाडोंगरी येथे उपचाराकरिता घेऊन गेले. तेव्हा आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर उपस्थित नव्हते. उपस्थित परिचारिका बांगर यांनी तपासणी केली. तेव्हा आॅक्सीजनची गरज आहे असे सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्राची वीज गेली होती. इन्व्हर्टर नादुरुस्त असल्याने आॅक्सिजन देता येणार नाही. त्यामुळे परिचारिका बांगर यांनी तुमसर येथे रेफर केले.
रस्त्यात कल्पनाची प्रकृती जास्तच खालावली व त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती आष्टीचे पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम.ए. कुरैशी यांना देण्यात आली. काही वेळानंतर ते एका अन्य डॉक्टरांसोबत प्राथमिक आरोग्य केंद्र नाकाडोंगरी येथे आले.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील इन्व्हर्टर नादुरुस्त आहे. तो दुरुस्त केला असता तर महिलेचा मृत्यू झाला नसता. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दोन पदे आहेत. त्यापैकी एक पद रिक्त आहे. दुसरे वैद्यकीय अधिकारी सुटीवर आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरे वैद्यकीय अधिकारी येथे ओपीडी करून निघून जातात. घटनेच्या दिवशी येथे परिचारिकेने तपासणी केली. वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. आपातकालीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची येथे गरज होती.
या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कुपनलिका बंद आहे. मूलभूत सोयीसुविधांचा येथे अभाव असल्याने अनेकदा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले असा आरोप करून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी पं.स. सदस्य शिशुपाल गौपाले यांनी केली आहे.
पर्यायी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी येथे नियुक्ती केली असून घटनेच्या दिवशी सदर डॉक्टर स्थानिक बाजारात गेले होते. येरली येथील डॉक्टरांकडे प्रभार देण्यात आला आहे. इन्व्हर्टरचा बॅकअप मिळाला नाही. मृत महिलेची प्रकृती चिंताजनक होती.
- डॉ. एम.ए. कुरैशी
तालुका वैद्यकीय अधिकारी, तुमसर.