वीजबिल भरण्याच्या नावाखाली दोन लाखांचा ऑनलाईन गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 05:50 PM2023-01-04T17:50:17+5:302023-01-04T17:56:45+5:30
तुमसर येथील प्रकार : एनीडेक्स ॲपने केला घात
भंडारा : ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार दररोज उघडकीस येत असताना, भामटे नवनवीन क्लृप्त्या शोधून ग्राहकांना फसवीत आहेत. तुमसर येथे वीजबिल भरण्याच्या नावाखाली एका महिलेला २ लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तुमसर ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
तुमसर येथील रवीदास वाॅर्डात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने २ जानेवारी रोजी मोबाईलमधील फोन पे-ॲपमधून वीजबिल भरले. त्यानंतर काही वेळात त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. संबंधित व्यक्तीने भरलेले बिल अपडेट झाले नाही. बिल अपडेट करण्यासाठी एनी डेक्स ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत विवाहितेने आपल्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड केला. त्यांच्या युनियन बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून तब्बल दोन लाख रुपये वळते झाल्याचे लक्षात आले. या प्रकाराची माहिती त्यांनी तुमसर ठाण्यात दिली असून, त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे
सध्या वीजबिल न भरण्याबाबत मॅसेज व्हाट्सअॅपद्वारे पाठविले जात आहे. नागरिकांनी वीजबिल भरले नसल्यास सोबतच्या क्रमांकावर मॅसेज करा असे लिलिले असते. मात्र, त्यातून ऑनलाइन फसवणूक केली जाते. नागरिकांनी असे मॅसेज आल्यास संबंधितांना प्रतिसाद देऊ नये तसेच कोणत्याही प्रकारचा पासवर्ड सांगू नये असे आवाहन भंडारा पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.
एनी डेक्स, टीम व्हिवर ॲप डाऊनलोड करू नका
अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून एनी डेक्स, डीम व्हिवरसारखे रिमोट एक्सेस ॲप डाउनलोड करू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी केले आहे. अनोळखी नंबरवरून काॅल आल्यास आपली वैयक्तिक माहिती देऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे.