घरगुती वादातून पेटवून घेतल्याने पती-पत्नीचा मृत्यू; तीन वर्षीय चिमुकला अनाथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 02:07 PM2022-01-16T14:07:43+5:302022-01-16T15:41:13+5:30
घरगुती वादातून पत्नीने स्वत:ला जाळून घेतले. पती तिला वाचवायला गेला असता दोघांचाही जळून मृत्यू झाला असून या दाम्पत्याचा तीन वर्षीय चिमुकला मात्र अनाथ झाला.
भंडारा : घरगुती वादात पत्नीने अंगावर राॅकेल ओतून पेटवून घेतले. तिला वाचविण्यासाठी पती गेला असता दोघांचाही यात जळून मृत्यू झाला. तर आई-वडिलांच्या निधनाने तीन वर्षीय चिमुकला मात्र अनाथ झाला. ही घटना भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा येथे शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
मेघा महेंद्र शिंगाडे (२९) आणि महेंद्र मिताराम शिंगाडे (४२) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. शनिवारी रात्री या दोघात उसनवारीच्या पैशावरुन वाद झाला. या वादात संतप्त मेघाने अंगावर राॅकेल ओतून पेटवून घेतले. तिला वाचविण्यासाठी महेंद्र धावला. मात्र मेघा ९६ टक्के तर महेंद्र ६६ टक्के जळाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली.
भिलेवाडा येथील महेंद्रचा विवाह पाच वर्षापूर्वी भंडारा तालुक्यातील पहेला येथील मेघासोबत झाला होता. महेंद्र हा डोडमाझरी ग्रामपंचायतीत संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. त्यांना तीन वर्षाचा रिहान नावाचा मुलगाही आहे. गत काही दिवसांपासून महेंद्रला दारुचे व्यसन लागले होते. त्यामुळेच पती-पत्नी नेहमीच वाद होत होता. शनिवारीही याच कारणावरुन वाद सुरू झाला. वादात मेघाने राॅकेल ओतून पेटवून घेतले आणि एका संसाराची राखरांगोळी झाली. तीन वर्षाचा रिहान मात्र अनाथ झाला.
या घटनेची माहिती होताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, कारधाचे ठाणेदार राजेशकुमार थोरात यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मिसळे करीत आहेत.