प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 10:55 PM2018-07-06T22:55:05+5:302018-07-06T22:55:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : गरोदर महिला व नवजात शिशु यांच्या सुरक्षेसाठी व मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. तरीही माता मृत्यू व नवजात बालमृत्युच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे शासनाचा या योजनेवरचा कोट्यवधीचा निधी खरोखरच खर्च होत आहे का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. साकोली येथे अशीच घटना नुकतीच उघडकीला आली आहे. बाळंतपणानंतर अवघ्या पाच-सहा तासातच महिलेचा मृत्यू झाला. बाळ सुखरूप असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
सुषमा दिगांबर मेश्राम (२८) रा.सेंदुरवाफा असे मृत महिलेचे नाव आहे. सुषमाचा दिगांबर मेश्राम यांच्याी मागीलवर्षी विवाह झाला. सुषमा ही पहिल्यांदाच गर्भवती होती. ती विर्शी प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रातून व खाजगी रूग्णालयातून औषधोपचार घेत होती. चार जुलैला सुषमाच्या गर्भाशयातील पाणी कमी झाल्यामुळे तिला साकोली येथील एका खाजगी रूग्णालयात दाखविण्यात आले. मात्र त्यावेळी प्रसुती वेदना वाढल्यामुळे तिची शस्त्रक्रियेने (सिझेरियन) प्रसुती करण्यात आली.
प्रसुतीनंतर अवघ्या तीन तासातच सुषमाची प्रकृती बिघडली. तिच्या छातीमध्ये अचानक त्रास सुरू झाला. त्यामुळे सुषमाला तातडीने नागपूर येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान तिथे सुषमाचा मृत्यू झाला.
यासंदर्भात सुषमाचे पती दिगांबर मेश्राम यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, प्रसुतीपूर्वी सुषमाच्या प्लेटलेट (लाल पेशी) १.५० लाख एवढ्या होत्या. प्रसुतीनंतर त्या ७० हजारावर आल्या. त्यानंतर नागपूर येथे प्लेटलेट चढविण्यात आले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही व या प्रकरणात आपला कुणावरही आक्षेप नाही, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मातृत्व हिरावले
सुषमाने एका गोंडस बाळाला जन्म दिला व काही तासातच तिने या जगाचा निरोप घेतला. सुषमाच्या अकाली जाण्याने बाळाचे मात्र मातृत्व हिरावले आहे.
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
शासन गर्भवती महिला व नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करते. नऊ महिने गर्भवती महिलांवर आरोग्य केंद्रात औषधोपचार करतात मात्र ऐन प्रसुतीच्या वेळी शासकीय रुग्णालयात योग्य उपचार होत नाही त्यामुळे बऱ्याच महिला प्रसूतीसाठी खाजगी रुग्णालयाची वाट बघतात.