शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू
By admin | Published: October 6, 2016 12:47 AM2016-10-06T00:47:52+5:302016-10-06T00:47:52+5:30
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती ढासळल्याने तिचा दोन दिवसानंतर नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
धारगाव आरोग्य केंद्रातील घटना : ग्रामस्थांचा मृतदेहासह अधिकाऱ्यांना घेराव
आमगाव (दिघोरी) : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती ढासळल्याने तिचा दोन दिवसानंतर नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सविता रामलाल नेवारे रा.कवलेवाडा असे मृत महिलेचे नाव आहे. शस्त्रक्रियेदरम्यान चुकीची नस कापल्याने तिचा मृत्यू झाला, असा आरोप करीत संतप्त नागरिकांनी धारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर मृतदेहासह तब्बल चार तास पर्यंत अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
भंडारा तालुक्यातील सविता नेवारे या ३२ वर्षीय महिलेला दोन अपत्ये आहेत. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन सदर महिला २८ सप्टेंबरला धारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली. २९ सप्टेंबरला शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिची प्रकृती बिघडत गेली. सविताला प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात व त्यानंतर नागपूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चुकीची नस कापल्याने तिची प्रकृती ढासळली व यातच तिचा मृत्यू झाला.तिच्या मृत्यूला शस्त्रक्रिया करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.टी. खंडारे व आरोग्य सेविका बांगरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या मागणीला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच नागरिकांनी गर्दी केली. नागपूरहून सविताचा मृतदेह दुपारी १ वाजताच्या सुमारास धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. संतापलेल्या जनसमुदायाने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळीजिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उईके, नायब तहसीलदार काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, यांच्यासह माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, अनिल गायधने, रुपेश खवास, संजय रेहपाडे, विनोद बांते, शेखर साखरे, राधेश्याम राऊत, बाबुलाल बंसोड, सदाशिव बोंदरे, युवराज नेवारे व ग्रामस्थ उपस्थित होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबियांना ३५ लक्ष रुपयांची मदत देण्यात यावी, सबंधित डॉक्टराची वैद्यकिय नोंदणी रद्द करण्यात यावी, कुंटुबियातील एकाला नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करीत नागरिकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला.
जिल्हा आरोग्य अधिकारी उईके यांनी दोन लक्ष रुपयांची मदत देण्याची घोषणा करून तात्काळ स्वरुपात ५० हजार रुपये देण्याचे सांगितले. याप्रकरणी चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. डॉक्टर खंडारे यांच्याशी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (वार्ताहर)
मुले झाली आईविना पोरकी
सविताला सात महिन्यांची मुलगी व पाच वर्षांचा एक मुलगा आहे. सवितावर शस्त्रक्रिया करताना तिच्या मुलांना कुटुंबियांनी सांभाळ केला. मुलगी दुधावरची असल्याने आई लवकरच घरी येईल, असे मुलांना समजविण्यात येत येत होते. परंतु ’आई हवी’ हा मुलांचा हट्ट कायमचा हट्टच राहिला. लहानगी आईच्या मृतदेहाला एकटक बघत असताना अनेकांची मने हेलावून गेली. जीवनाचा संघर्ष या छकुलीच्या डोळ्यात जणू सागर म्हणून वाहत होता. सविताचा पती ढसाढसा रडत असताना त्याला धीर तरी कसा द्यावा, हे सुचेनासे झाले.