महिलांनो, उद्योगाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा
By admin | Published: March 29, 2016 12:35 AM2016-03-29T00:35:22+5:302016-03-29T00:35:22+5:30
महिलांनी महिलांना साथ दिली तर त्या सक्षमपणे काम करु शकतात. महिला बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचा महिलांनी स्वयंरोजगारासाठी पूर्णपणे वापर करावा...
भाग्यश्री गिलोरकर यांचे प्रतिपादन : वैनगंगा जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन, ६६ स्टॉलचा समावेश
भंडारा : महिलांनी महिलांना साथ दिली तर त्या सक्षमपणे काम करु शकतात. महिला बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचा महिलांनी स्वयंरोजगारासाठी पूर्णपणे वापर करावा आणि उद्योगाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बचत गटांच्या उत्पादनाची चार दिवसीय जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा परिषद सदस्य निळकंठ कायते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. एस.पी. गायगवळी उपस्थित होते.
गिलोरकर म्हणाल्या, महिला प्रामाणिकपणे कर्जफेड करतात. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बचत गटांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. या संधीचा महिलांनी रोजगारासाठी उपयोग करावा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण असल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. मात्र मिळालेल्या पदाचा व अधिकाराचा समाजासाठी उपयोग व्हावा म्हणून अभ्यासपूर्वक प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे म्हणाले, महिलांना सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. आपण आजही महिलांना बरोबरीचा दर्जा देत नाही. मात्र महिला स्व:कर्तृत्वावर सर्व क्षेत्रात आघाडी घेत आहेत. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. एस.पी. गायगवळी यांनी ग्रामीण जीवन्नोनती अभियानांतर्गत महिला बचत गटांसाठी आणि महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अमंलबजावणीची माहिती दिली. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीमध्ये ६६ स्टॉल्स लावण्यात आले असून भंडाराव्यतिरिक्त गोंदिया, गडचिरोली, नागपूर आणि चंद्रपूर येथील बचत गटांच्या स्टॉलचाही समावेश आहे.
संचालन स्मिता गालफाडे आणि मुकुंद ठवकर यांनी केले. आभार प्रदर्शन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केले. (नगर प्रतिनिधी)