वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
By admin | Published: May 28, 2016 12:30 AM2016-05-28T00:30:09+5:302016-05-28T00:30:09+5:30
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका ४० वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करुन ठार मारले. वाघाने हल्ला केला तेव्हा ती ...
नवरगाव जंगलातील घटना : महिलेचा शोध सुरुच
पहेला : तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका ४० वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करुन ठार मारले. वाघाने हल्ला केला तेव्हा ती महिला जीवाच्या आकांताने अन्य महिलांना पळून जा, असे जोरजोराने ओरडत होती. सवर्णा कवडू गणवीर रा. नवरगाव असे या महिलेचे नाव असून वृत्त लिहीपर्यंत तिचा मृतदेह आढळला नव्हता. तिचे रक्ताने माखलेले कपडे नवरगाव जंगलातील घटनास्थळ परिसरात आढळले. ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
भंडारा तालुक्यातील पहेला परिसरातील नवरगाव, निमगाव यासह अन्य गावातील महिला तेंदुपत्ता संकलनासाठी गाव शेजारील जंगलात समुहाने जात असतात. नवरगाव येथील काही महिला तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगल शिवारात गेल्या होत्या. यात सवर्णा गणविर याचाही समावेश होता. सकाळी ९ वाजताच्या सुमारास जंगलात तेंदूपत्ता तोडीत असताना दबा धरुन बसलेल्या वाघाने सवर्णा यांच्यावर झडप घातली. जीवाच्या आकांताने सवर्णा ह्या ओरडू लागल्या. मात्र त्यातही त्यांना सोबतीच्या महिलांना ओरडून पळून जाण्याचे सांगिते. सोबतच्या महिलांनी पळ काढीत गावात येवून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली.
ज्या ठिकाणी सवर्णा गणवीर यांच्यावर वाघाने हल्ला केला त्या परिसरात रक्ताने माखलेले कपडे मिळाले. यावरुन सदर महिला जिवंत नसावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती भंडारा वनविभाग व अड्याळ पोलीस ठाण्यात देण्यात आली. ग्रामस्थांसह वन विभागाचे कर्मचारी महिलेच्या शोध घेत आहे. सायंकाळी गणवीर यांचा शोध घेण्याचे कार्य सुरु होते. या घटनेने मात्र नवरगाव येथे शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)