महिलांना जागृत होण्याची आवश्यकता
By admin | Published: August 13, 2016 12:23 AM2016-08-13T00:23:30+5:302016-08-13T00:23:30+5:30
आजच्या महिलांना शासनाने अनेक अधिकार दिलेले आहेत. ते जाणून घेण्यासाठी महिलांना जागृत होण्याची आवश्यकता आहे
विजया राऊत यांचे प्रतिपादन : महिला सक्षमीकरण अंतर्गत महिला मेळावा
मोहाडी : आजच्या महिलांना शासनाने अनेक अधिकार दिलेले आहेत. ते जाणून घेण्यासाठी महिलांना जागृत होण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन प्रा.डॉ.विजया राऊत यांनी येथे आयोजित महिला सक्षमीकरण सप्ताह कार्यक्रमांतर्गत व्यक्त केले.
तहसील कार्यालय मोहाडी तर्फे परमात्मा एक भवन मोहाडी येथे महिला सक्षमीकरण अंतर्गत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांच्या राजकीय जाणिवा व सहभाग या विषयांतर्गत प्रा.डॉ.विजया राऊत, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावर प्रा.डॉ.ज्योती पांडे, महिलांचे सामाजिक सक्षमीकरण या विषयावर प्रा.डॉ.मुबारक कुरैशी, स्त्री सक्षमीकरण या विषयावर स्त्री मुक्ती अभ्यासक प्रा.डॉ.सुनिल चवळे, महिलांचे मानसिक रोग प्रा.राहुल डोंगरे, महिलांचे आरोग्य या विषयावर डॉ.योगिनी भैसारे, कायदेविषयक माहिती व अधिकार या विषयावर मंजू बांते या वक्त्यांनी मार्गदर्शन केले. महिलांच्या सक्षमीकरणासंबंधी प्रा.डॉ.चवळे निर्मित चलचित्राचे प्रक्षेपण सुद्धा करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष चरण वाघमारे उपस्थित होते. याप्रसंगी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्त्री सक्षमीकरण या विषयावर निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. परिक्षक म्हणून डॉ.मुबारक कुरेशी व प्रा.महेश भैसारे यांनी कार्य केले. समन्वयक म्हणून उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, तहसीलदार धनंजय देशमुख, गटविकास अधिकारी लांजेवार, तालुका कृषी मंडळ अधिकारी राहुल गायकवाड इत्यादी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)