सरकारी योजनेच्या लाभासाठी महिला सरपंचाने वाढवले वय !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 11:08 AM2024-09-21T11:08:55+5:302024-09-21T11:09:39+5:30

बनावट आधार कार्ड केले तयार : वय ४९ वरून थेट ७१

Women Sarpanch increased the age for the benefit of the government scheme! | सरकारी योजनेच्या लाभासाठी महिला सरपंचाने वाढवले वय !

Women Sarpanch increased the age for the benefit of the government scheme!

राजू बांते 
लोकमत न्यूज नेटवर्क 
मोहाडी :
सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. चक्क सरपंचांनीच बोगस आधार कार्ड तयार केले. वृद्धापकाळ निर्वाह योजनेचा लाभ घेण्यासाठी पिंपळगाव (कान्हळगाव) येथील सरपंचाने वय वाढवून लाभ घेण्याचा उपद्व्याप केल्याचा प्रकार पुढे आला आहे.


रेखा ज्ञानेश्वर गभणे असे या सरपंच महिलेचे नाव आहे. आठ वर्षांपूर्वी त्यांनी वृद्धापकाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्रावरून बनावट आधार कार्ड तयार केले. ३७५८ ५०१२ २७२७ या क्रमांकाचे दोन आधार कार्ड तयार करून घेतले. एकावर १० नोव्हेंबर १९७५, तर दुसऱ्या आधार कार्डवर १ जानेवारी १९५३ अशा जन्मतारखा मुद्रित आहेत. त्या दोनपैकी दुसरे आधार कार्ड वापरून त्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. खोट्या जन्मतारखेच्या आधार कार्डनुसार त्यांचे वय ७१ वर्षे आहे. प्रत्यक्षात त्यांचे वय ४९ वर्षे आहे. रेखा गभणे या ग्रामपंचायत निवडणुकीला उभ्या असताना त्यांनी सरपंचपदासाठी ऑनलाइन नामनिर्देशन दाखल केले होते. नामनिर्देशनपत्र दाखल करताना शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर असलेल्या प्रमाणेच ऑनलाइन अर्जातही १० नोव्हेंबर १९७५ ही जन्मतारीख लिहिलेली आहे. त्यांचे माहेर भंडारा तालुक्यातील सिरसी येथील असून, गावच्या शाळेच्या रेकॉर्डवरही १० नोव्हेंबर १९७५ अशीच जन्मतारीख नोंदविलेली आहे, हे येथे उल्लेखनीय. 


असे फुटले बिंग 
मोहाडी तहसीलदारांमार्फत वृद्धापकाळ निर्वाह योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी मोहीम आखण्यात आली होती. लाभार्थ्यांकडून वयाचे पुरावे जमा करण्यात आले. त्यात रेखा गभणे यांनी वय वाढवून दिलेले आधार कार्ड तलाठ्यांकडे जमा केले. दरम्यानच्या काळात हा प्रकार गावचे उपसरपंच उमेश उपरकर, ग्रामपंचायत सदस्य विजय चोपकर, बिरजलाल गभणे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे तक्रार करून कारवाईची आणि सरपंचपदावरून अपात्र करण्याची मागणी केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 


सरकारची दिशाभूल
निवडणूक लढण्यासाठी टीसीचा आधार घेतला. वृद्धापकाळ निर्वाह योजनेच्या लाभासाठी बनावट आधार कार्डचा वापर केला. दोन्ही आधार कार्ड बघितल्यावर हे लक्षात येते. त्यांच्या आंधळगाव येथील बँक खात्यावर महिन्याला दीड हजार रुपये मानधन जमा झाले


"मला वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळत आहे. त्यासाठी आधार कार्ड बनविले, हे मान्य करते. एकटी मीच नाही त्यावेळी गावातील अनेकजण तसेच ग्रामपंचायत सदस्यदेखील या योजनेचा लाभ घेत आहे."
- रेखा गभणे, सरपंच, ग्रामपंचायत पिंपळगाव (कान्हळगाव)


 

Web Title: Women Sarpanch increased the age for the benefit of the government scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.