महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहन द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:33 AM2021-02-14T04:33:15+5:302021-02-14T04:33:15+5:30
ग्रामीण व शहरी भागातील बहुजन समाजातील महिला उच्चशिक्षित झालेल्या असून उद्योग व रोजगाराअभावी मोलमजुरीचे काम करून आपला ...
ग्रामीण व शहरी भागातील बहुजन समाजातील महिला उच्चशिक्षित झालेल्या असून उद्योग व रोजगाराअभावी मोलमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शासनाचे उद्योग व रोजगार विभाग, तसेच बरीच विकास महामंडळे आहेत परंतु या विकास महामंडळांचा लाभ किती आणि कोणत्या महिलांना झाला, असा प्रश्न पडला आहे. ग्रामीण भागातील महिला अजूनही उद्योग व रोजगारापासून वंचित असून रोजगारासाठी वणवण भटकावे लागते. परंतु रोजगार मिळत नसल्याने वीतभर पोटाची खळगी कशी भरावी आणि दैनंदिन व्यवहार कसा करावा, मुला-मुलींचे शिक्षण व लग्न कसे करावे यासारखे इतर प्रश्न महीलांसमोर आवासून उभे ठाकले आहेत.
याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित विभागाने वेळीच दखल घेऊन ग्रामीण व शहरी भागातील महिलांना उद्योग रोजगारासाठी प्रोत्साहित करणारा लोककल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेऊन तमाम महिलांना दिलासा द्यावा अशी मागणी भीमशक्ती महिला संघटना जिल्हा भंडाऱ्याचे जिल्हाध्यक्ष अरुणा दामले, उपाध्यक्ष पपिता वंजारी, रूपा लेंधारे, विभा रामटेके, माधुरी सुखदेवे, सुमन वंजारी, संघमित्रा गेडाम, प्रमिला बोरकर, शर्मिला बोरकर, विशाखा बनसोड, मंदा मेश्राम, वनमाला बोरकर, इंदू बारसागडे, लक्ष्मी मेश्राम, सरिता टेंभुर्णे, मनीषा मेश्राम, संयोगिता खोब्रागडे यांनी केली आहे.