स्त्रियांनी सामर्थ्यवान व्हावे
By admin | Published: December 30, 2015 01:36 AM2015-12-30T01:36:33+5:302015-12-30T01:36:33+5:30
नूतन कन्या शाळेची निर्मिती पवित्र यज्ञाप्रमाणे झालेली आहे. या शाळेत शिक्षणाच्या माध्यमातून स्त्री शक्ती जागृत केली जाते.
वेदप्रकाश मिश्रा यांचे प्रतिपादन : नूतन कन्या शाळेचे स्नेहसंमेलन
भंडारा : नूतन कन्या शाळेची निर्मिती पवित्र यज्ञाप्रमाणे झालेली आहे. या शाळेत शिक्षणाच्या माध्यमातून स्त्री शक्ती जागृत केली जाते. आजच्या काळात स्त्रियांनी समर्थ व योग्य स्थान मिळविण्यासाठी आत्मविश्वास बाळगावा, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. स्थानिक नूतन कन्या शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाप्रसंगी डॉ.मिश्रा बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहरराव बोंगीरवार होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार रामचंद्र अवसरे, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, संस्थेचे कार्यवाह अॅड. एम. एल. भुरे, प्राचार्या शीला भुरे आदी उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डॉ. विकास ढोमणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी सर्व विद्यार्थिनीनी सकारात्मक विचार ठेवून योग्य त्या दिशेने वाटचाल करावी. तसेच मूलभूत विज्ञानाचा अभ्यास करुन संशोधन क्षेत्राकडे वाटचाल करावी, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या शीला भुरे यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते हस्तलिखित व प्रतिबिंब वार्षिक वार्तापत्रचे विमोचन करण्यात आले. शाळा नायिका सायली देशकर व राधीका राजाभोज यांनी अहवाल वाचन केले. याप्रसंगी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनी खेळाडू, एनसीसी व इतर विद्यार्थीनीना पोरितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक मोहन दाढी यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहरराव बोंगिरवार यांनी शाळेच्या प्रगतीत शाळेचे व्यवस्थापक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी या पाच घटकांचा महत्वाचा सहभाग असल्याचे सांगितले.
विद्यार्थिनीनी दर्जेदार शिक्षण अर्जित करुन स्वामी विवेकानंद, डॉ. अब्दुल कलाम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतीसारखे व्हावे. तसेच स्वत:च्या प्रगतीबरोबर देशाचा विकास करावा, असे मत अॅड. एम. एल. भुरे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी आमदार अवसरे यांनी शाळेच्या विद्यार्थिनीचे कौतुक करुन सर्वांना शुभेच्दा दिल्या.
सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगिता गुर्जर यांनी सुजाण नागरिक तयार होण्यासाठी शिक्षक व पालकांनी जागरुक राहावं असे आवाहन त्यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या गटविकास अधिकारी मंजुषा ठवकर यांनी विद्यार्थीनीना स्पर्धा परिक्षेविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी आंतरराष्ट्रीय प्रकाशवर्षाचे औचित्य साधून प्रकाशवर्ष संकल्पना ही पॉवरपॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थिनीना दाखविण्यात आली. तसेच ‘जावे आरोग्याच्या गावा’ हे भारुड व नृत्य व विविध गाणी विद्यार्थीनीनी सादर केलीत.
कार्यक्रमाचे संचालन स्नेहसंमेलन प्रभारी शिक्षिका जयश्री मेश्राम व रोहिणी मोहरील यांनी केले. आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक मोहन दाढी यांनी केले. (प्रतिनिधी)