स्त्रियांनी वाण देताना पुस्तके भेट द्यावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:32 AM2021-01-18T04:32:12+5:302021-01-18T04:32:12+5:30
भंडारा : मकर संक्रांतीनिमित्त महिलांनी सामाजिक भान ठेवून एकमेकींना पुस्तकाचे वाण भेट द्यावे आणि मस्तकं सुदृढ करून कुणापुढेही विनाकारण ...
भंडारा : मकर संक्रांतीनिमित्त महिलांनी सामाजिक भान ठेवून एकमेकींना पुस्तकाचे वाण भेट द्यावे आणि मस्तकं सुदृढ करून कुणापुढेही विनाकारण नतमस्तक होऊ नये, असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष शिल्पा खंडाईत यांनी केले. राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती सिद्धार्थ बुद्धविहार, महात्मा फुले कॉलनी, भोजापूर येथील प्रांगणात महिलांकडून साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.
राजमाता जिजाऊ यांचे जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी सुमधुर आवाजात स्वागत गीत, वंदनेचे गायन केले. प्रास्ताविक इंद्रायणी सुखदेव यांनी केले. छोट्या बालकलाकारांनी मां जिजाऊ यांच्या जीवनावर गौरव गीत गायन केले. सौम्या खंडाईत, निराली झंझाड या बालकांनी प्रेरणादायी भाषण केले.
प्रव्रज्जा सुखदेवे, लिखांशी घोडसे यांनी मां जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर नृत्य सादर केले. ओवी, जिजाऊ वंदना तसेच एकपात्री प्रयोग काव्यांजली असे भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी फुले कॉलनीतील सर्व स्त्रिया कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा शिल्पा खंडाईत यांनी जिजाऊच्या लेकींनी वटसवित्रीच्या सणाबरोबर पर्यवारणाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकीने एक एक वृक्ष लावून त्याचे जतन करावे. तसेच महिलांनी मकर संक्रांतीला वाण देताना एकमेकींना पुस्तके भेट देऊन मस्तके सुदृढ करून कुणापुढेही विनाकारण नतमस्तक होऊ नये, असे प्रतिपादन करून विवाहित महिलांबरोबरच विधवा महिलांनाही पुस्तकी ज्ञानाचे वाण भेट देण्याचे मोलाचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका कुंदा गभने यांनी आजच्या ज्वलंत प्रश्नावर प्रकाश टाकून ओबीसी आरक्षण, ओबीसी जनगणना तसेच शेतकरी विरोधी कायद्यासंबंधाने वक्तव्य करून संघर्षासाठी पेटून उठण्याची जाणीव करून दिली.
यावेळी प्रमुख अतिथी प्राध्यापक श्वेता उदापुरे, इंदू डेकाटे, संध्या शेंदूरकर रेणू भोंगाडे इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पुष्पा रामटेके यांनी स्त्रियासाठी असलेल्या अनेक योजनांची माहिती देऊन जनजागृती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मिताली रंगारी यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार हेमा नागदेवे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावली व असेच जनजागृतीचे कार्य व्हावे, अशी आशा व्यक्त केली.