महिलांनी दुकानदाराला ३० हजारांनी गंडविले
By admin | Published: April 16, 2017 12:18 AM2017-04-16T00:18:45+5:302017-04-16T00:18:45+5:30
कुठलाही व्यवसाय म्हटले की, दुकानात येणाऱ्या ग्राहकांची गर्दी आलीचं. दुकानात येणारा ग्राहक हा दुकानदारासाठी एकप्रकारे देवच असतो.
अड्याळ येथील प्रकार : अंगातील पेटीकोटमध्ये लपवून नेल्या साड्या
भंडारा : कुठलाही व्यवसाय म्हटले की, दुकानात येणाऱ्या ग्राहकांची गर्दी आलीचं. दुकानात येणारा ग्राहक हा दुकानदारासाठी एकप्रकारे देवच असतो. मात्र, कधीकधी असे ग्राहक दुकानदारांना आर्थिक नुकसान पोहचविणारे असतात. कापड दुकानात आलेल्या चार महिलांनी त्यांच्या अंगातील साडीखालील पेटीकोटमध्ये लपवून तब्बल ३० हजारांच्या साड्या चोरून नेल्या. ही घटना पवनी तालुक्यातील अड्याळ येथे एका कापड दुकानात घडला.
गोपाल बंसीलाल टावडी (५७) अशोकनगर अड्याळ असे महिलांनी गंडविलेल्या कापड व्यावसायीकाचे नाव आहे. गुरूवारला ही घटना घडली असून अड्याळ पोलिसांनी या प्रकरणी चार अनोळखी महिलांविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. गुरूवारला गोपाल टावडी हे दुकानात असताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास ३५ ते ४० वर्ष वयोगटातील चार अनोळखी महिला दुकानात आल्या. महिला ग्राहक असल्याने दुकानदार टावडी यांनी त्यांचे आवभगत केले. यावेळी महिलांनी दुकानदारांना चांगल्या प्रतिच्या साड्या दाखविण्याची मागणी केली. महागड्या साड्या दाखवित असताना व दुकानदारांचे लक्ष नसल्याची संधीसाधून या महिलांनी त्यांनी परिधान केलेल्या साड्यांच्या खालील पेटीकोटमध्ये दुकानातील महागड्या साड्या लपविल्या. याची साधी कल्पनाही दुकानदार टावडी यांना आली नाही. महिला निघून गेल्यावर त्यांना दाखविलेल्या महागड्या साड्यांपैकी काही साड्या व बंगलोर स्लीप दिसून आल्या नाही. त्यामुळे ग्राहक म्हणून आलेल्या तोतया महिला ग्राहकांनी दुकानदाराला लुबाडल्याचे स्पष्ट झाले. यावरून गोपल टावडी यांनी अड्याळ पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तपास सहायक फौजदार नंदेश्वर करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)