पाण्यासाठी महिलांचा आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:34 AM2018-09-28T00:34:43+5:302018-09-28T00:36:01+5:30
शहरातील प्रभाग १४ मध्ये पाण्याची भीषण समस्या असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या प्रभागातील नागरिकांना मुबलक प्रमाणात शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात यावा याकरीता नगरसेवक नितीन धकाते यांच्या नेतृत्वात २६ सप्टेंबर रोजी भंडारा नगर परिषदेवर महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील प्रभाग १४ मध्ये पाण्याची भीषण समस्या असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या प्रभागातील नागरिकांना मुबलक प्रमाणात शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात यावा याकरीता नगरसेवक नितीन धकाते यांच्या नेतृत्वात २६ सप्टेंबर रोजी भंडारा नगर परिषदेवर महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी नगर परिषद प्रशासनाने एका आठवड्यात पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.
प्रभाग १४ मध्ये मोठया प्रमाणात मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे ते खाजगी नळ घेऊ शकत नाही. या वॉर्डात सार्वजनिक नळ हे बोटावर मोजण्या इतके आहेत. येथील अनेक नळावर दुगंधीर्युक्त पाणी वाहत असते. त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी दारोदार भटकावे लागत आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेला अंतिम स्वरूपात येण्यासाठी अजून बराच कालावधी शिल्लक असतांना तोपर्यंत नागरिकांना पाण्याविना ठेवणार काय? असा सवाल यावेळी नगरसेवक नितीन धकाते यांनी प्रशासनाला विचारला.
यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष आशु गोंडाणे, उपमुख्याधिकारी कळंबे यांना नगरसेवक नितीन धकाते यांच्या नेतृत्वात वार्ड वासियांनी निवेदन सादर केले. निवेदन देताना सदानंद धकाते, रेणुका धकाते, भाजीखाये, निळकंठ धकाते, संदीप कुंभारे, देवेंद्र कोहाड, सुरेश कोहाड, मीना खेताडे, चंदा हेडाऊ व वाडार्तील पुरुष, महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
शहरातील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ही फार जुनी असुन पुर्णपणे जिर्ण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी लिकेज होवून नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. जीर्ण झालेल्या पाईपलाईनचा शोध घेवून ती दुरूस्त करण्याकरीता जवळपास एका आठवडयाचा कालावधी लागेल.तोपर्यंत प्रभागातील नागरिकांना आवश्यक तेवढ्या प्रमाणात टँकरने पाणी पुरवठा केला जाईल.
-आशिष गोंडाणे, उपाध्यक्ष, न. प. भंडारा
पावसाळयात नागरिकांना पाण्याची समस्या उद्भवने हे नगर पालीका प्रशासनाचे अपयश आहे. येत्या एका आठवड्यात प्रभागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन भंडारा नगर परिषदेने दिले आहे. एका आठवडयात पाण्याचा प्रश्न न सुटल्यास नगर पालिकेला घेराव घालून नगर परिषद कार्यालयासमोर नगर परिषद प्रशासनाविरोधात घोषणा देत तिव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही नगर पालीका प्रशासनाची राहिल.
-नितीन धकाते, नगरसेवक, भंडारा