महागाईविरोधात महिला काँग्रेसचा मोर्चा
By admin | Published: June 23, 2016 12:28 AM2016-06-23T00:28:16+5:302016-06-23T00:28:16+5:30
वाढत्या महागाईविरोधात सध्या सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे.
भंडारा : वाढत्या महागाईविरोधात सध्या सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे. त्याची झळ महिला वर्गाला अधिक बसत असल्याचा आरोप करत भंडारा जिल्हा महिला काँग्रेसने त्रिमूर्ती चौक भंडारा येथे महिलांनी ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करत निदर्शने केली.
महिला काँग्रेसच्या वतीने भंडारा जिल्हा परिषद चौकातून भाजपाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. विविध करदेखील वाढले आहेत. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. निवडणुकीआधी भाजपा सरकारने अनेक आश्वासने दिली. आज ही आश्वासने हवेतच विरली आहेत. त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण त्यांना करून द्यावी, त्यांना जाग आणावी म्हणूनच हा मोर्चा काढण्यात आल्याचे भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा भुरे यांनी स्पष्ट केले. भाज्या, फळभाज्या, तेल, डाळ, पेट्रोल, डिझेलचे भाव वाढतच असल्याने सर्वच स्तरावरील नागरिकांचे जगणे दुरापास्त झाल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झालेल्या होत्या. परंतु भाजपा कार्यालयाकडे जात असताना पोलिसांनी हा मोर्चा वाटेतच अडविला. त्यामुळे त्रिमूर्ती चौकातच हा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळ असो वा संध्याकाळ, जेवणातून गायब झाली डाळ, महागाई की मार भारी है, अब मोदी सरकार की जाने की बारी है. अशा घोषणा देण्यात आल्या. या मोर्चाचे नेतृत्व भंडारा जिल्हा काँग्रेस अध्यक्षा सीमा भुरे, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, मोहाडीच्या नगराध्यक्षा स्वाती निमजे यांनी केले. यावेळी जि.प. सदस्य वंदना पंधरे, जि.प. सदस्य रेखा वासनिक, मंदा गणवीर, सुगंधा नंदागवळी, मंगला बगमार, सभापती पं.स. लाखांदूर, कल्पना जांभुळकर लाखनी, मीरा उरकुडकर पवनी, भारती लिमजे भंडारा, मोहिनी नंदनवार, ताराबाई नागपुरे, अस्मिता वाघमारे, निरंजना साठवणे, सीमा साठवणे, वंदना मेश्राम, गीता बोकडे, सुनीता सोरते, सीमा बावणे, शोभा करडे, अरुणा श्रीपाद, प्रीती बागडे, लीला पाथोडे, माला फुंडे व असंख्य महिला कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)