स्वतंत्र महिला रुग्णालयासाठी महिला काँग्रेसची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:09 AM2019-07-11T01:09:51+5:302019-07-11T01:10:20+5:30
महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा दावा केंद्र सरकार व राज्य शासन करीत आहे, परंतु गत पाच वर्षांपासून जिल्हास्तरावर स्वतंत्र महिला रुग्णालयाचे बांधकाम रखडले आहे. राज्य शासनाने निधी न दिल्यास भंडारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाभर आंदोलन करेल, असा गर्भीत इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा दावा केंद्र सरकार व राज्य शासन करीत आहे, परंतु गत पाच वर्षांपासून जिल्हास्तरावर स्वतंत्र महिला रुग्णालयाचे बांधकाम रखडले आहे. राज्य शासनाने निधी न दिल्यास भंडारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाभर आंदोलन करेल, असा गर्भीत इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. बुधवारी जिल्हा महिला काँग्रेस पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
भंडारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र महिला रुग्णालयाचा आराखडा तयार करण्यात आला, परंतु इमारत बांधकामाकरिता निधी दिला नाही. भंडारा जिल्ह्यात मध्यप्रदेश व नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण परिसरातील विविध आजाराने ग्रासलेल्या शेकडो महिला भंडारा येथे येतात. महिलांना उपचाराकरिता मोठा त्रास होत आहे. त्याकरिता महिलांचे स्वतंत्र रुग्णालय असणे गरजेचे आहे.
भंडारा जिल्ह्यात सात तालुके असून तालुका स्तरावरुन 'रेफर टू भंडारा' असा प्रकार मागील अनेक महिन्यापासून सुरु आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक विस्तार मोठा आहे. त्यामुळे सुसज्ज महिला रुग्णालयाची गरज आहे. राज्य शासनाने तात्काळ निधी मंजूर करुन रखडलेल्या रुग्णालयाची कामे त्वरित सुरु करावी, अन्यथा त्या विरोधात जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमेटीने दिला आहे.
शिष्टमंडळाचे नेतृत्व भंडारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सीमा भुरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर यांनी केले. शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष नुतन भोले, महासचिव करुणा धुर्वे, शहर अध्यक्ष सुरेखा सहारे, नंदागवळी, मोहाडीच्या नगराध्यक्ष गीता बोकडे, नगरसेविका जयश्री बोरकर, कविता बावणे, जिल्हा परिषद सदस्य शुध्दमता नंदागवळी, चित्रा सावरबांधे, निशा गणवीर, वनिता मलेवार, वंदना मलेवार, नैनश्री येळणेसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.