मायक्रो फायनान्सविरुद्ध महिलांचा मोर्चा
By admin | Published: January 4, 2017 12:40 AM2017-01-04T00:40:18+5:302017-01-04T00:40:18+5:30
मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून ग्रामीण व शहरी भागातील महिलांची होत असलेली आर्थिक पिळवणूक थांबवावी व कर्जमुक्ती देण्यात यावी, ...
शेकडो महिला रस्त्यावर : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भंडारा : मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून ग्रामीण व शहरी भागातील महिलांची होत असलेली आर्थिक पिळवणूक थांबवावी व कर्जमुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा व महिला बचतगटांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा मंगळवारला काढण्यात आला. या मोर्चात शेकडो अन्यायग्रस्त महिला सहभागी झाल्या होत्या.
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मायक्रोफायनान्स कंपन्यांचे जाळे आहेत. या जाळ्यात अडकून ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी कर्ज घेतले. मात्र कर्जफेड करताना आर्थिक पिळवणूक होत असल्याची बाब उघडकीला आली. परिणामी या पिळवणुकीतून व कर्जमुक्तीतून सुटका मिळविण्यासाठी तालुकास्तरावर निवेदने व अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करण्यात येत होती. परंतु समस्येवर तोडगा निघाला नाही. दरम्यान मायक्रोफायनान्स कंपन्याविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना व महिला बचतगटांनी आंदोलन पुकारले.
मंगळवारला येथील शास्त्रीनगर चौकातून शेकडो महिलांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. दुपारी २.३० वाजता त्रिमूर्ती चौकात मोर्चा पोहोचल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व बचतगटाच्या पदधिकारी महिलांनी सभेला संबोधित केले. यात मायक्रोफायनान्स कंपनीच्या तावडीतून महिलांची सुटका करून कर्जमुक्ती झाली पाहिजे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहून यांना देण्यात आले. (प्रतिनिधी)