अवैध दारूविक्रीविरोधात पालेपेंढरीच्या महिलांचा एल्गार, ग्रामपंचायतींवर दिली धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 04:53 PM2022-01-28T16:53:51+5:302022-01-28T17:28:21+5:30

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतींवर हल्लाबोल आंदोलन करीत अवैध दारू विक्रेत्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

Women's march on gram panchayat against illicit liquor sale | अवैध दारूविक्रीविरोधात पालेपेंढरीच्या महिलांचा एल्गार, ग्रामपंचायतींवर दिली धडक

अवैध दारूविक्रीविरोधात पालेपेंढरीच्या महिलांचा एल्गार, ग्रामपंचायतींवर दिली धडक

Next
ठळक मुद्देमहिलांच्या आंदोलनानंतर दारू विक्रेत्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

भंडारा : गत पाच ते सहा महिन्यांपासून गावातीलच दोन व्यक्तींकडून अवैधरीत्या दारू विक्रीचा व्यवसाय केला जात असल्यामुळे गावात नेहमीच मद्यपींकडून धिंगाणा केला जायचा, अनेकांचे संसार मोडण्याच्या मार्गावर आले होते. मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतींवर हल्लाबोल आंदोलन करीत अवैध दारू विक्रेत्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना गुरूवारी लाखांदूर तालुक्यातील पालेपेंढरी येथे घडली.

तालुक्यातील पालेपेंढरी या छोट्याशा गावातील नागरिक गुण्या-गोविंदाने नांदत असताना गत पाच ते सहा महिन्यांपासून गावातील बालक कोंडी पिल्लेवान (४०) व सवितराव वसंतराव पिल्लेवान (२७) यांनी गावात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. गावातच दारू मिळत असल्यामुळे गावात मद्यपी सकाळपासूनच दारू ढोसासचे. त्यांच्यामुळे अनेकांचे संसार विस्कटण्याच्या मार्गावर आले होते. त्यामुळे गावातील महिला बचट गटांनी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाकडे दारू बंदीची मागणी केली होती. महिलांच्या मागणीनुसार सरपंच वर्षा नरुले यांनी ग्रामपंचायतींच्या मासिक सभेत दारू बंदीकरिता एकमताने ठराव पारीत करून पालांदूर पोलिसांकडे सादर केला होता. मात्र गावातील दारू बंद न होता खुलेआम विक्री व्यवसाय सुरूच होता.

दरम्यान, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून केलेल्या मागणीची दखल घेतली जात नसल्यामुळे गुरुवारी गावातील बचत गटाच्या महिला व उपसरपंच भोजराज नान्हे यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना गावापासून दूर काही अंतरावर रंगेहात पकडून स्थानिक ग्रामपंचायत कार्यावर हल्लाबोल आंदोलन केले. यानंतर महिलांनी दारू विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करत अटक करण्याची मागणी केली होती. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दारू विक्रेत्यांना पोलीस अटक करीत नाहीत. तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत कार्यालयासमोरून हलणार नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला होता. त्यामुळे सरपंच वर्षा नरुले, ग्रामसेविका लिमजे यांनी पालांदूर पोलीसांशी संपर्क साधून तत्काळ येऊन अटक करण्याची मागणी केली. त्यानुसार ठाणेदार सावंत यांनी घटनास्थळ गाठून दोन पेटी दारूसह दोन्ही दारू विक्रेत्यांना अटक करून ताब्यात घेतले. दारू बंदी मोहिमेत उपसरपंच भोजराज नान्हे, अमित शिवणकर, लेकराम शिवणकर, योगेश शिवनकर, प्रज्वल शिवणकर, भूषण सेलोटे, चिंतामण मस्के, शुभम शिवणकर, सौरभ शिवणकर,तसेच गावातील महिलांचा सहभाग होता.

Web Title: Women's march on gram panchayat against illicit liquor sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.