पिके वाचविण्यासाठी शेतकºयांची केविलवाणी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:50 PM2017-09-11T23:50:49+5:302017-09-11T23:51:05+5:30
शासनाच्या महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियानात करडी व बेटाळा जि.प. क्षेत्रात २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षात मोठे काम झाले.
युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : शासनाच्या महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियानात करडी व बेटाळा जि.प. क्षेत्रात २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षात मोठे काम झाले. शासन-प्रशासनाने मेहनत घेतली. मागील वर्षी या योजनांतील पाण्याचा वापर करून शेती पिकविली गेली. कोरड्या दुष्काळावर मात करता आली. मात्र यावर्षी सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्याने, जलयुक्त शिवारातील जलस्त्रोत कोरडी पडल्याने परिस्थिती बिकट आहे. रोवणी अभावी हजारों एकर शेती पडित तर रोवणी झालेले पीक उन्हाने करपली आहेत. अत्यल्प पावसाचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
ग्लोबल वार्मिंगमुळे दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. कमी अधिक पर्जन्यमान, अनियमितता यामुळे शेती नेहमी संकटात सापडते. शेतीतील संकटावर कायम स्वरूपी मात करता यावी, पर्जन्यवाढीसाठी उपाय योजनाबरोबर जलसंचयाला, स्त्रोतांच्या बळकटीकरणाला व पाण्याच्या योजनाबद्ध नियोजनाला प्राधान्य देण्याचा विचार शासनाने केला. पाण्याचा ताळेबंद प्रभाविपणे राबविण्याचा विचार पुढे आला. त्यातूनच गावांच्या गरजेनुसार योजना आखण्याला प्राधान्यक्रम देण्यात आले. लोकसहभागाचा उपयुक्त वापर करण्याकडेही प्रयत्न सुरू झाले. जलयुक्त शिवार योजनेने आकार घेत योजना कार्यान्वीत करण्यात आली. सन २०१५-१६ वर्षापासून विविध विभागांच्या यंत्रणांनी मृद व जलसंधारणाचे, जलस्त्रोत बळकटीकरण, खोलीकरण, पाण्याचे योग्य वितरण व अपव्यय टाळण्यासाठी पाटांच्या दुरूस्त्या व सिमेंटीकरण, बांधबंधाºयांची दुरूस्ती, पाळ व गेटचे नुतनीकरण व मजबुतीकरण, भुजलसाठ्यात वाढ तसेच वृक्ष लागवड तसेच लोकसहभागातूनही अनेक तलाव बोड्यांचे पुनर्जिवन करण्यात आले. कृषी विभाग, पाटंबंधारे, वनविभाग, पंचायत समिती, जलसंधारण व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जिल्ह्यात विविध जलसंधारण व मृद संधारणाच्या कामांना गती देण्यात आली. उथळ व गाळाने बजबजलेल्या तसेच अतिक्रमण झालेले तलावांनी मोकळा श्वास घेतला. अतिक्रमण झालेले नाले व बंधाºयांचे खोलीकरण करण्यात आले.
नाला व बंधाºयांचे खोलीकरण करण्यात आल्याने पाण्याचा साठा वाढीस लागला. तुटलेले बंधारे दुरूस्त करून बळकटीकरणाला गती देण्यात आली. जलसंधारण विभागाच्या वतीने सुद्धा जलयुक्त शिवार योजनेत कामे झाली. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड व संगोपनात मोलाचे कार्य पार पडतील.
करडी जि.प. क्षेत्रात मागील वर्षी जलयुक्त शिवार योजनेतून अनेक कामे करण्यात आली. यात साठविलेल्या पाण्याचा वापर करून रोवणी झालीत. धानाची शेती पिकविली. मात्र यावर्षी कमी पावसामुळे नाले, तलाव कोरडी असून बरीच रोवणी झालेली नाहीत. तर रोवणी झालेले पीक करपू लागले आहेत.
-निलिमा इलमे, जि.प. सदस्या करडी.
बेटाळा जि.प. क्षेत्रात पावसाअभावी हाहाकार आहे. शेती पडीत तर रोवणे झालेले धान वाचविण्यासाठी पाण्याची बोंबाबोंब आहे. जलयुक्त शिवार योजना कोरड्या पडल्याने परिसरावर भीषण दुष्काळाचे सावट उभे ठाकले आहे. .
-सरिता चौरागडे, जि.प. सदस्या बेटाळा क्षेत्र.