जातीय सलोखा समितीचे अॅम्बेसेडर म्हणून काम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:01 AM2018-04-13T01:01:53+5:302018-04-13T01:01:53+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, बौद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन या सारखे सण, उत्सव संयम व एकोप्याने साजरे करण्यात यावे. सण आणि उत्सव हे सामाजिक एकता व बंधुत्वाचे प्रतीक असून यादरम्यान कुठलाही तणाव न राहता शांतीचा संदेश समाजापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, बौद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन या सारखे सण, उत्सव संयम व एकोप्याने साजरे करण्यात यावे. सण आणि उत्सव हे सामाजिक एकता व बंधुत्वाचे प्रतीक असून यादरम्यान कुठलाही तणाव न राहता शांतीचा संदेश समाजापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. आगामी काळातील सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी जातीय सलोखा समितीचे अॅम्बेसेडर म्हणून काम करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी केले.
पोलीस बहुउद्देशीय सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय जातीय सलोखा समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष सुनिल मेंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय अधिकारी सुजाता गंधे, उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर, महावितरणचे कार्यकारी अभियंता बी.ए. हिवरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, प्रभाकर टिक्कस उपस्थित होते.
यावेळी त्या म्हणाल्या, आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असून या काळात नागरिकांनी शांततेचे व संयमाचे दर्शन घडविणे आवश्यक आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व बौध्द पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यात शोभायात्रा काढण्यात येतात. महाराष्ट्र स्थापना दिवस शासकीय व निमशासकीय कार्यालये तथा महाविद्यालयात साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान वाद होऊ नये, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये, धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्सवादरम्यान बऱ्याच वेळा अफवा पसरविल्या जातात व त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी नागरिकांनी सतर्क राहून अफवांवर विश्वास ठेऊ नये. त्याचप्रमाणे सोशल मिडियावर पसरविण्यात येणाºया संदेशाची खात्री केल्याशिवाय ते पुढे पाठवू नये, असे अवाहनही त्यांनी केले. शांततापूर्ण उत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांच्या सहकार्याशिवाय सण, उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे शक्य नाही, असे सांगून साहू यांनी शांततापूर्ण वातावरण कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
सण, उत्सव काळात डीजेवर न्यायालयाने मर्यादा घातलेल्या आहेत. त्या मर्यादेच्या अधीन राहून डिजे वाजविण्यात यावा. डिजेच्या परवानगीसाठी पोलीस विभाग कुठलाही भेदभाव करीत नाही. मात्र न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून नागरिकांनी डिजे लावावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष सुनिल मेंढे म्हणाले, उत्सवाला गालबोट लागू नये व समाजात जातीय सलोखा कायम रहावा याची खबरदारी घेण्याची जबाबदारी सर्वाची असल्याचे सांगितले. समारंभ, जयंती, पुण्यतिथीच्या निमित्ताने सामाजिक एकोपा निर्माण व्हावा, असे सुजाता गंधे म्हणाल्या. यावेळी बी.ए. हिवरकर म्हणाले, मनामध्ये कटूता निर्माण न होता उत्सव साजरे करावे. जातीय सलोखा समितीच्या सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करून सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. आभारप्रदर्शन उपअधीक्षक सुनील कुळकर्णी यांनी केले.