कोविड-१९ काळातील महिलांनी केलेले कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:35 AM2021-03-10T04:35:26+5:302021-03-10T04:35:26+5:30
भंडारा : समाजाच्या विकासासाठी बचत गटांची, महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे, बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक ...
भंडारा : समाजाच्या विकासासाठी बचत गटांची, महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे, बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार दिला असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ स्वतः समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविला आहे, प्रत्येक महिला ही कुटुंबाचा खरा आधार आहे, तसेच कोविड काळात जे कार्य माविमने केले ते खरोखरच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी वसुंधरा फाळके यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा तर्फे आयोजित मोहाडी येथील माविम प्रांगणात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, लेखाधिकारी मुकुंद देशकर, भावना डोंगरे, राकेश कुरंजेकर उपस्थित होते. जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला असून बचत गटातील महिलांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले आहे. व मुलांना चांगले संस्कार देऊन चांगल्या पदावर पोहोचविले आहे असे मत व्यक्त केले. यावेळी कोविड- १९ च्या काळात काम करणाऱ्या कर्मचारी रेखा उमाळे, मनोज केवट व ललीता कुंभलकर यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. मागील २० वर्षापासून बचत गट सांभाळणाऱ्या सहयोगिनी शोभा आंबुने, शशिकला कोवाची, अनुसया देशमुख, नूतन लांजेवार यांनी आपला प्रवास व्यक्त केला. याप्रसंगी बचत गटाला बॅंक कर्ज मिळवून देणे व त्याची परतफेड योग्य होणे याकरिता कुमुद नंदेश्वर, ममता बांबोर्डे, शशिकला कोवाची, अस्मिता रामटेके, सविता तिरपुडे, निलू जिभकाटे, संध्या रामटेके, मंगला बावणे, मनिषा वाघमारे यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला लेखाधिकारी मुकुंद देशकर, भावना डोंगरे, राकेश कुरंजेकर, केंद्र व्यवस्थापक, लेखापाल, क्षेत्रीय समन्वयक व सहयोगिनी उपस्थित होत्या.
संचालन सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी विष्णुपंत झाडे यांनी केले तर आभार क्षेत्रीय समन्वयक मनोज केवट यांनी मानले. यशस्वीतेसाठी शामराव बोंद्रे, सुरेंद पिसे, महेंद्र गिलोरकर यांनी सहकार्य केले.