निधीअभावी उड्डाणपुलाचे काम कासवगतीने
By admin | Published: August 3, 2016 12:42 AM2016-08-03T00:42:31+5:302016-08-03T00:42:31+5:30
तुमसर - गोंदिया राज्य मार्गावरील देव्हाडी उड्डाणपुलाचे काम निधीअभावी कासवगतीने सुरु आहे.
पावणेपाच कोटींची कामे झाली : रेल्वे प्रशासनाने निविदा काढली नाही
तुमसर : तुमसर - गोंदिया राज्य मार्गावरील देव्हाडी उड्डाणपुलाचे काम निधीअभावी कासवगतीने सुरु आहे. अशीच गती सुरु राहिली तर पाच वर्षात पुल पूर्ण होणार नाही. रेल्वे प्रशासनाने अद्यापपावेतो कामांची निविदा काढली नाही. त्यामुळे उड्डाणपुलाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई - हावडा रेल्वे क्रॉसिंग देव्हाडी येथे ५३२ वर तथा तुमसर गोंदिया राज्य महामार्गावर दीड वर्षापूर्वी उड्डाणपुल बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली होती. राज्य शासन व रेल्वे प्रशासन येथे संयुक्त पद्धतीने उड्डाणपुल तयार करीत आहे. ४२ कोटींचा खर्च येथे अपेक्षित आहे. राज्य शासन २८ कोटी तर रेल्वे प ्रशासन १४ कोटींचा निधी खर्च करणार आहे.
राज्य शासनाने आतापर्यंत सुमारे पावने पाच कोटींचा निधी येथे खर्च केला. यात दोन्ही बाजूंचा बायपास रस्ता, नाली बांधकाम भुयारी मार्गाच्या कामांचा समावेश आहे. एका बाजूचे बायपास रस्त्याचे काम अजूनही अर्धवटच आहे. दीड वर्षापासून येथे कासवगतीने कामे सुरु आहेत. अर्धवट कामामुळे वाहतुकीला अडथडे निर्माण होत असून अपघातात येथे सातत्याने वाढ होत आहे. तुमसर - गोंदिया राज्य मार्गावर मोठी वाहतूक आहे.
राज्य शासनाकडून निधींची येथे प्रतीक्षा आहे. मुख्य सीमेंट उड्डाणपुलाचे काम रेल्वे प्रशासनाला करावयाचे आहे. परंतु अजूनपर्यंत रेल्वे प्रशासनाने कामांची निविदाच काढली नाही. त्यामुळे राज्य शासनाचे काम संथगतीने सुरु असल्याची माहिती आहे. अॅप्रोच रोड व बायपास रस्त्यांची कामे राज्य शासनाकडे आहेत. खा.नाना पटोले तथा आ.चरण वाघमारे यांनी येथे लक्ष घालण्याची गरज आहे.
दर तीन मिनिटांनी येथे रेल्वे फाटक बंद होते. अर्धवट बांधकाम व बायपास रस्त्याने वाहने काढणे येथे जिकरीचे काम आहे. वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा येथे लागतात. कामे कासवगतीने सुरु असल्याने नागरिकांत रोष व्याप्त आहे. (तालुका प्रतिनिधी)