हादरे बसणाऱ्या आंतरराज्य बावनथडी पुलाचे काम थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:39+5:302021-04-30T04:44:39+5:30
२९ लोक ०७ के तुमसर : महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवरील नाकाडोंगरी शिवारात आंतरराज्य महामार्गावरील बावनथडी नदीवरील पुलाला हादरे ...
२९ लोक ०७ के
तुमसर : महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवरील नाकाडोंगरी शिवारात आंतरराज्य महामार्गावरील बावनथडी नदीवरील पुलाला हादरे बसत होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या पुलावरील संपूर्ण वाहतूक मागील एका वर्षापूर्वी बंद केले होती. त्यानंतर दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूक येथे पुन्हा सुरू झाली. सदर पूल दुरुस्तीच्या कामाला अजूनपर्यंत सुरुवात झाली नाही. दुरुस्तीची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र व मध्य प्रदेशाला जोडणारा तुमसर बालाघाट आंतरराज्य मार्गावर नाका डोंगरी शिवारात बावनथडी नदीवर सुमारे चाळीस वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आले होते. सदर पुलावरून दोन्ही राज्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. या जड वाहतुकीचा समावेश अधिक आहे. या पुलावरून जड वाहने जातानाही पुलाला मोठ्या प्रमाणात हादरे बसत होते. त्यामुळे धोक्याची शक्यता येथे वर्तविण्यात येत होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरून वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतली. तज्ज्ञांच्या समितीनेसुद्धा पुलाला हादरे बसत असल्यामुळे दुरुस्ती करण्याचा अहवाल दिला.
जिल्हा प्रशासनाने मागील एक वर्षापूर्वी या पुलावरून सर्व वाहनांकरिता वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले. पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे उभारून पुलावरील पोचमार्ग खोदण्यात आला होता. त्यामुळे काही दिवस पुलावरून संपूर्ण वाहतूक बंद होती. त्यानंतर पुन्हा या पुलावरून दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू झाल्याची माहिती आहे. तुमसर तालुक्यातील नदीकाठावरील गावे व मध्य प्रदेशातील नदी काठावरील गावांच्या नागरिकांचे जाणे- येणे आहे. अनेकांचे नातलग राहतात त्याकरिता त्यांना जाण्यास मोठा अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे लहान वाहनांची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांची होती.
बॉक्स
..तर ३५ किलोमीटरचा फेरा
बपेरा मार्गावरून जाण्याकरिता तीस ते पस्तीस किलोमीटरच्या फेरा मारून जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष होता.
पुलाची दुरुस्ती नाही
मागील एक वर्षापासून सदर पूल जड वाहतुकीकरिता बंद आहे. संबंधित विभागाने निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली अशी माहिती आहे. परंतु प्रत्यक्षात पूल दुरुस्तीच्या कामाला अजूनपर्यंत सुरुवात करण्यात आलेली नाही. आंतरराज्य महामार्ग असल्यामुळे येथे प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची गरज होती. सध्या ब पेरा मार्गावरून वाहतूक सुरू आहे. सदर मार्ग राज्यमार्ग असल्यामुळे या रस्त्याची दुरवस्था होत आहे. यासंदर्भात तुमसर येथील अभियंत्यांना भ्रमणध्वनीवरून दोनदा संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.