पक्ष संघटनेसाठी कामाला लागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 09:49 PM2018-03-16T21:49:52+5:302018-03-16T21:49:52+5:30
भाजप सरकारने सामान्य नागरिकांपासून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. याशिवाय गावागावात जावून जनतेच्या अडचणी आणि समस्या जाणून घ्या.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : भाजप सरकारने सामान्य नागरिकांपासून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. याशिवाय गावागावात जावून जनतेच्या अडचणी आणि समस्या जाणून घ्या. जनतेच्या समस्या निराकरणासाठी रस्त्यावर येऊन सरकारचे हे अपयश जनतेच्या निदर्शनास आणून द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेता तथा खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी केले.
भंडारा विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निरिक्षकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, माजी आमदार अनिल बावनकर, दिलीप बन्सोड, प्रदेश सचिव धनंजय दलाल, विजय शिवणकर नरेश माहेश्वरी, दुध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, मजूर संघाचे अध्यक्ष कैलाश नशिने, माजी नगराध्यक्ष विजय डेकाटे, अभिषेक कारेमारे, कल्याणी भुरे उपस्थित होते.
यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, भंडारा विधानसभा क्षेत्रात ४५५ बुथ आहेत. प्रत्येक बुथची जबाबदारी स्वतंत्ररित्या निरिक्षकांना देण्यात येत आहे. त्या निरिक्षकावर त्या-त्या गावाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निरिक्षकांनी गावातील जनतेच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतले पाहिजे. जनतेच्या समस्या निराकरणासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पक्ष संघटनवाढीसाठी तळागाळातील जनतेच्या मदतीसाठी धावून जावून त्या समस्या सोडवा, असे सांगून बुथ निरीक्षकांचा आढावा आपण स्वत: दर महिन्याला घेणार असल्याचे आवर्जुन सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे आदींनी मार्गदर्शन केले. बैठकीचे संचालन धनंजय दलाल यांनी केले.