तीन लाखांचे काम केवळ तीस हजारांत पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:22 AM2021-06-30T04:22:54+5:302021-06-30T04:22:54+5:30
चुल्हाड ( सिहोरा ) : तुमसर तालुक्यातील बिनाखी गावच्या स्मशानभूमीत ये-जा करणाऱ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी आमदार, खासदारांना ...
चुल्हाड ( सिहोरा ) : तुमसर तालुक्यातील बिनाखी गावच्या स्मशानभूमीत ये-जा करणाऱ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी आमदार, खासदारांना निधी मंजुरीसाठी निवेदन देऊनही दुर्लक्ष होत होते. अनेक वर्षांपासून पुलाचे बांधकाम रेंगाळले होते. यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी लोकसहभागातून तीन लाखांचे पुलाचे बांधकाम अवघ्या तीस हजारांत पूर्ण केले. गावकऱ्यांनी एक आदर्श निर्माण केला असून, लोकप्रतिनिधींनी निधी देण्यास टाळाटाळ केल्याने संताप व्यक्त होत आहे.
तुमसर - बपेरा राज्य मार्गावर असणाऱ्या दीड हजार लोकवस्तीच्या बिनाखी गावात स्मशानभूमी नसल्याने गावकरी ७ ते ८ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बपेरा व सुकली नकुल गावांतील स्मशानभूमीत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत होते. यामुळे आप्तस्वकीयांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. रात्री, अपरात्री अंत्यसंस्कारासाठी जाताना लांब पल्ल्याचे गाव गाठण्याची वेळ गावकऱ्यांवर येत होती. गावच्या हद्दीत नाल्यालगत स्मशानभूमीची निर्मिती करण्यात आली; परंतु या स्मशानभूमीत ये-जा करणाऱ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले नाही. रस्ता चिखलातील असल्याने गावकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करीत मृतदेह न्यावा लागत होता. स्मशानभूमीतील रस्ता व नाल्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी गावकऱ्यांनी आमदार, खासदारांना अनेकदा निवेदन दिले. अनेक विभागांना पत्रव्यवहारही केला. मात्र, याला केराची टोपली दाखविण्यात आली. गेल्या १० वर्षांपासून कुणी ऐकत नसल्याने गावकऱ्यांनी स्वत:च पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी लोकसहभागातून कामाचा प्रस्ताव ठेवला. पुलाचा बांधकाम खर्च तीन लाख सांगितल्याने तेवढा निधी गोळा करणे शक्य नव्हते. यामुळे गावकऱ्यांनी जुन्या पुलाचे सिमेंट पाइप जमा करीत सिमेंट, रेती, लोखंड लोकसहभागातून जमा केले. लोकसहभागातून पुलाचे बांधकाम केवळ तीस हजारांत पूर्ण झाले आहे. आता पावसाळ्यात मृतदेह नेताना त्रास होणार नाही. याचे गावात समाधान व्यक्त होत आहे.
कोट
गावकऱ्यांचे हे कार्य अन्य गावकऱ्यांनाही प्रेरणादायी ठरत आहे.
गावातील स्मशानभूमीत जाण्यासाठी नाल्यावर पूल नसल्याने चिखल, पाण्यातून मृतदेह न्यावा लागत होता. पूल बांधकामासाठी निधी देण्यात आला नाही. यामुळे लोकसहभागातून गावकऱ्यांनी पुलाचे बांधकाम केले आहे. यामुळे सध्यातरी समस्या सुटली आहे.
- देवेंद्र मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य, बिनाखी