आयुध निर्माणीचे कामगार संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 09:51 PM2019-08-20T21:51:16+5:302019-08-20T21:53:38+5:30
खासगीकरणाच्या विरोधात आयुध निर्माणीचे कर्मचारी आंदोलनात उतरले असून देशव्यापी संपात येथील जवाहरनगर आयुध निर्माणीचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी ९५ टक्के कामगार संपावर गेल्याने काम पूर्णत: ठप्प झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी येथे चोख बंदोबस्त लावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : खासगीकरणाच्या विरोधात आयुध निर्माणीचे कर्मचारी आंदोलनात उतरले असून देशव्यापी संपात येथील जवाहरनगर आयुध निर्माणीचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी ९५ टक्के कामगार संपावर गेल्याने काम पूर्णत: ठप्प झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी येथे चोख बंदोबस्त लावला आहे.
देशातील अग्रणी समजल्या जाणाऱ्या व सैन्य सामुग्रीचा पुरवठा करणाºया आयुध निर्माणीचे केंद्र सरकारने खासगीकरणाचा घाट घातला आहे. याचा परिणाम आंतरिक व बाह्य सुरक्षा यंत्रणेवर पडणार आहे. खासगीकरण थांबविण्यासाठी देशपातळीवरील ४१ आयुध निर्माणीमध्ये संपाची हाक देण्यात आली. त्यानुसार मंगळवारी जवाहरनगर आयुध निर्माणीतील बहुतांश कामगार या संपात सहभागी झाले. बीपीएमएस, आईएनटीयुसी, आयडीईएफ या संघटनांसह स्थानिक आयुध निर्माणी कर्मचारी संघ, न्यू एक्झ्प्लोझीव्ह फॅक्ट्री युनियन, आयुध निर्माणी एम्प्लॉईज युनियन, डेमोक्रेटीक मजदूर युनियन यांनी संयुक्त संघर्ष समितीच्या बॅनरखाली एक महिना संपाची घोषणा केली.
त्यानुसार मंगळवार २० आॅगस्ट पासून १९ सप्टेंबर पर्यंत कामगार संपावर जाणार आहेत. विविध संघटनेचे पदाधिकारी कामगारांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करीत होते. त्यामुळे सुमारे ९५ टक्के कर्मचारी सहभागी झाले. सकाळी आंदोलनस्थळी तणाव निर्माण झाले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी रिना जनबंधू, ठाणेदार सुभाष बारसे, आयुध निर्माणीचे लेफ्टनंट कर्नल अभिजीत वैद्य आपल्या ताफ्यासह रात्रीपासून शॅडल पॉइंटवर डेरेदाखल आहेत.