क्रेनवरून पडून कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 10:20 PM2017-12-22T22:20:33+5:302017-12-22T22:21:02+5:30
सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनीत यंत्र दुरुस्त करताना २० फूट उंचीवरून खाली पडून एका कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
आॅनलाईन लोकमत
वरठी : सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनीत यंत्र दुरुस्त करताना २० फूट उंचीवरून खाली पडून एका कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रमेश जिभकाटे (४९) रा.डोंगरला ता.तुमसर असे मृत मजुराचे नाव आहे. ही घटना गुरूवारी रात्री १० वाजताच्या सुमारास कंपनीच्या पिकलींग यॉर्ड विभागात घडली. .
रमेश हा सनफ्लॅग कंपनीत क्रेन विभागात कार्यरत होता. काल २१ रोजी तो नियमित वेळेनुसार दुपारच्या पाळीत कामावर होता. क्रेनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची सूचना मिळाली. ते सहकाऱ्यासोबत यंत्र दुरुस्ती करण्याकरिता गेला. यंत्राची दुरुस्ती करण्याकरिता ते व त्यांचे सहकारी जवळपास २० फूट उंचीवर असलेल्या क्रेनवर चढून काम करीत होते. दुरुस्ती करीत असताना त्याचा तोल गेल्याने ते २० फूट उंचीवरून खाली कोसळले.
यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यंत्र दुरुस्ती करीत सोबत नेलेले साहित्य सुद्धा त्याच्या सोबत खाली पडल्यामुळे, काम करीत असताना तोल गेला असावा व अपघात घडला असा कयास व्यक्त केला जात आहे. कंपनीतील दोन वषार्तील ही दुसरी घटना आहे. रमेश जिभकाटे हे तिरोडा तालुक्यातील रणेरा येथील मूळ असूनअसून ते तुमसर तालुक्यातील डोंगराला येथे राहत होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे.