कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:13 PM2018-01-24T23:13:51+5:302018-01-24T23:15:27+5:30
पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागातील कनिष्ठ सहाय्यक जितेंद्र नंदागवळी यांच्यावर माजी उपसभापती ललीत बोंद्रे यांनी मंगळवारला हात उगारला होता.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागातील कनिष्ठ सहाय्यक जितेंद्र नंदागवळी यांच्यावर माजी उपसभापती ललीत बोंद्रे यांनी मंगळवारला हात उगारला होता. याचे पडसाद कर्मचाऱ्यांमध्ये उमटले. बुधवारला जिल्हा परिषद व सातही पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदविला. दरम्यान ललीत बोंद्रे यांनी लेखी माफीनामा लिहून दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.
भंडारा पंचायत समितीत नंदागवळी हे कार्यरत आहेत. मंगळवारला ललीत बोंद्रे हे काही कामे घेऊन पंचायत समितीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी नंदागवळी यांना बोलाविले होते. मात्र नंदागवळी हे उशिरा पोहचल्याने माजी उपसभापती ललित बोंद्रे यांनी त्यांना शिवीगाळ करीत हात उगारल्याचा प्रकार घडला. बुधवारला जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी संघटनेने काळ्या फिती लावून घटनेचा निषेध करून लेखणी बंद आंदोलन केले.
दरम्यान कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर कळंबे, सचिव टी.सी. बोरकर, जिल्हा संघटक अतुल वर्मा, कार्याध्यक्ष सतीश मारबदे, महेश इखारे, प्रभू मते, केसरीलाल गायधने, मनिष वाहाणे यांच्यासह कृती समितीच्या पदाधिकाºयांनी मुख्य कार्यपालन अधिकारी, खंडविकास अधिकारी आर.आर. झोडपे यांना निवेदन दिले.
त्यानंतर पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरु केल्याने प्रशासनाच्या कामकाजात अडचण निर्माण झाली. दरम्यान, ललित बोंद्रे यांनी लेखी माफीनामा लिहून दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
बोंद्रे यांनी केली दिलगिरी व्यक्त
कनिष्ठ सहाय्यक नंदागवळी हे कामात कुचराईपणा करून अरेरावीची भाषा वापरतात, असा बोंद्रे यांनी हात उगारला. त्यामुळे नंदागवळी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले. दरम्यान आज खंडविकास अधिकारी झोडपे यांच्या कक्षात भाजपचे जि.प.गटनेते अरविंद भालाधरे यांच्या नेतृत्वात माजी पं.स.सभापती प्रल्हाद भुरे, जि.प.सदस्य प्रेमदास वनवे, यशवंत सोनकुसरे, गोवर्धन साकुरे यांच्या पुढाकारातून कृती समितीच्या पदाधिकाºयांशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी बोंद्रे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने कर्मचाºयांनी आंदोलन स्थगित केले.
नंदागवळी यांच्याकडून काढला प्रभार
या प्रकरणाने वादग्रस्त ठरलेले कनिष्ठ सहाय्यक लिपीक जितेंद्र नंदागवळी यांच्याकडून समाजकल्याण विभागाचा प्रभार काढण्यात यावा, अशी मागणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी भंडारा पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी झोडपे यांनी नंदागवळी यांच्याकडून समाजकल्याण विभागाचा प्रभार काढत असल्याचे सांगितले.