महसूल कर्मचारी संघटनेचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 11:22 PM2017-10-12T23:22:40+5:302017-10-12T23:22:51+5:30
पुरवठा विभागाचे सर्व कामकाज बंद असून मागण्यांसंदर्भात राज्य महसूल कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन छेडले आहे. विशेष म्हणजे या काम बंद आंदोलनात निवडणुकीचे काम वगळण्यात आले असून फक्त महसूली कामे बंद आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पुरवठा विभागाचे सर्व कामकाज बंद असून मागण्यांसंदर्भात राज्य महसूल कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन छेडले आहे. विशेष म्हणजे या काम बंद आंदोलनात निवडणुकीचे काम वगळण्यात आले असून फक्त महसूली कामे बंद आहेत.
या आशयासंदर्भात जिल्हाधिकाºयांना जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील सरळ सेवेच्या वाट्यातील पदे जी महसूल विभागातील अव्वल कारकून संवर्गातून बदलीने भरण्यात येतात ती पदे टप्प्याटप्प्याने जाहिरातीच्या अनुषंगाने निर्देशित करण्याचे विभागीय आयुक्तांनी कळविले आहे. संदर्भात सरळ सेवेच्या उमेदवारांची भरती झाल्यानंतर महसूल विभागाची पदे प्रस्थापित करण्यात यावीत असेही निर्देश आहेत. त्यामुळे महसूल लिपिकाचे पदनाम महसूल सहाय्यक करणे, नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे ४ हजार ३०० वरुन ४ हजार ८०० करण्यात यावा, अव्वल कारकून वर्ग तीन या संवर्गाच्या वेतन श्रेणीमधील त्रृटी दूर करण्यात यावी, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्यात यावी, नायब तहसीलदारांचे सरळ सेवा भरतीचे पद प्रमाण ३३ वरून २० टक्के करून पदोन्नतीचे प्रमाण ८० टक्के करावे, दांगट समितीने सादर केलेल्या प्रस्तावात आकृतीबंधात सुधारणा करण्यासाठी लिपिक, अव्वल कारकून, नायब तहसीलदार व इतर पदांमध्ये कपात करू नये, संजय गांधी योजना, गौण खनीज व महसूल व इतर कामासाठी नव्याने आकृतीबंध तयार करणे, पुरवठा विभागातील निरीक्षक पद पदोन्नतीचे असल्यामुळे सरळ सेवेने भरण्यात येऊ नये मागण्यांचा समावेश आहे. कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सभा घेऊन मागण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी संघटनेचे किशोर राऊत, एस.एस. साखरवाडे, संजय जांभुळकर अन्य कर्मचारी उपस्थित होते.