नोकरी ही शिक्षकांसाठी कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:03 PM2018-01-10T22:03:04+5:302018-01-10T22:03:37+5:30
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्यामुळे अनेक शाळा बंद पडल्या असून काही बंद करण्याच्या मार्गावर आहेत.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्यामुळे अनेक शाळा बंद पडल्या असून काही बंद करण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शिक्षकी नोकरी ही शिक्षकांसाठी अंधकारमय ठरणारी आहे. नोकरी टिकविणे व मराठी शाळा वाचविणे ही शिक्षकांसाठी तारेवरची कसरत ठरणार असल्याचे प्रतिपादन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माजी आ. व्ही. यु. डायगव्हाने यांनी केले.
तुमसर येथील आर.एस.जी.के. अग्रवाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे भंडारा जिल्हा अधिवेशन पार पडले. यावेळी डायगव्हाने बोलत होते. अधिवेशनाला प्रांतिक अध्यक्ष श्रावण बरडे, सरकार्यवाह सुधाकर अडबाले, महाराष्ट्र राज्य शिक्षक मंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव कारेमोरे, श्रीधर खेडीकर, राजेश धुर्वे, ओ.बी. गायधने, के.आर. ठवरे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर रहांगडाले, संजय वारकर, टी.डी. मारबते, अनिल गोतमारे, विद्यालयाचे प्राचार्य कमलानंद पप्पुलवार यांची उपस्थिती होती.
यावेळी डायगव्हाने यांनी सध्याची शिक्षण प्रणाली ही उद्योगपती व ठेकेदारांची मक्तेदारी बनत चालली आहे. शिक्षण संघातून निवडून येणारा शिक्षक आमदार भविष्यात दिसणार नाही. या माध्यमातून शिक्षकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप डायगव्हाने यांनी यावेळी व्यक्त केला.
भंडारा जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे यांनी संघटनेचा लेखाजोखा सादर केला. यावेळी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात एन.टी. तितीरमारे, रामचंद्र ठाकूर, कुंदन बोरकर, रामदयाल पारधी, अरविंद कारेमोरे, राजकुमार बांते, संजय वारकर, राजेश धुर्वे, अनिल गोतमारे, तुकाराम बांते, भिष्मा टेंभुर्णे यांचा समावेश होता. या अधिवेशनात शैक्षणिक समस्यावर व शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन बदलाबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी सुधाकर अडबाले यांनी, गोर-गरीबांचे शिक्षण हिकावून ही सरकार उद्योगपतींच्या हातात शिक्षण प्रणाली देत असल्याचा आरोप केला.
या अधिवेशनात शिक्षण विषयक विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान भंडारा जिल्ह्याची नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी पी.एम. वालदे, एस.पी. साखरे यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. अनंत जायभाये यांच्या समारोपीय भाषणाने अधिवेशनाची सांगता करण्यात आली. अविधेशनासाठी तुमसर शहर, तालुका कार्यकारणी तथा जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकाºयांनी सहकार्य केले.