नैसर्गिक रंग तयार करण्याची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:32 AM2021-03-22T04:32:20+5:302021-03-22T04:32:20+5:30
कोरोना विषाणूचे सावट जरी असले तरी होळीसारख्या सणाला बाहेर नाही, तर घरीच रंगाची उधळण होईल. कोणत्याही प्रकारचे रासायनिक रंग ...
कोरोना विषाणूचे सावट जरी असले तरी होळीसारख्या सणाला बाहेर नाही, तर घरीच रंगाची उधळण होईल. कोणत्याही प्रकारचे रासायनिक रंग न वापरता फुलांपासून, पानांपासून यात झेंडू, शेवंती, गुलाब, पळस, कागदी फुले व पाने, कडुलिंबाची पाने, बीटचा सुकविलेला किस, हळद, बेसन, तांदळाचे पीठ, शेंदूर, कुंकू, आदीचा वापर करून रंग कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण वर्षा भांडारकर यांनी दिले. कार्यशाळेत जिजामाता आदिवासी बचत गटाच्या ज्योती कोठेवार, कोमल बचत गटाच्या अश्विनी फाये, लाडली गटाच्या सुशीला कोठेवार, शुभ गटाच्या योगिता मेंढे व रिना बिसेन यांनी रंग कसे तयार करायचे हे जाणून घेतले. या महिला आपल्या गटातील महिलांना प्रशिक्षण देतील व अधिकाधिक रंग तयार करून त्याची विक्रीसुद्धा करणार आहेत. या नैसर्गिक रंगांपासून कोणतेही डोळ्यांचे, केसांचे व त्वचेचे आजार होणार नाहीत. कोरोना असल्यामुळे रासायनिक रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंगांचा वापर केल्यास पाण्याची बचत तर होईलच, पण आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य राहील. होळीचा दरवर्षीप्रमाणे आनंद घेता येईल व पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, असे मत संस्थाध्यक्ष वर्षा भांडारकर यांनी व्यक्त केले.