मृत्यूनंतरही त्यांचे डोळे पाहणार जग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:27 AM2017-09-23T00:27:02+5:302017-09-23T00:28:31+5:30
‘मरावे परी किर्ती रूपे उरावे’, अशी म्हण आहे, परंतु ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ हा साक्षात प्रयत्न तुमसर येथील अनिल घनश्याम लांजेवार यांच्या मृत्यूनंतर खरा ठरला आहे.
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : ‘मरावे परी किर्ती रूपे उरावे’, अशी म्हण आहे, परंतु ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ हा साक्षात प्रयत्न तुमसर येथील अनिल घनश्याम लांजेवार यांच्या मृत्यूनंतर खरा ठरला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी तातडीने निर्णय घेऊन नेत्रदान करण्याचा संकल्प केला. रूग्णालय प्रशासनाने दखल घेऊन अवघ्या तीन तासात डोळे सुस्थितीत काढून नेत्रपेढीत रवाना केले. त्यामुळे मृत्युनंतरही त्यांचे डोळे पुन्हा जग पाहणार आहेत.
तुमसर येथील माकडे नगरातील प्रगतशील शेतकरी अनिल घनश्याम लांजेवार (५८) यांना २० सप्टेंबरला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तुमसर येथील नेताजी सुभाषचंद्र उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना भंडारा येथे हलविण्यात आले.
अनिल यांचे धाकटे भाऊ सुनिल लांजेवार यांनी त्यांना डॉ.कोचर यांचेकडे नेण्याचा निर्णय घेतला. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. नागपूरला नेताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा दुसरा धक्का बसला. भंडारा येथे एका खाजगी रूग्णालयात नेल्यावर डॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर तुमसर येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले.
धाकटे भाऊ मुंबईत होते. त्यांनी पत्नी शोभा लांजेवार (माजी नगरसेविका) यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून भाऊचे नेत्रदान करावयाचे आहे. वहिनी गीता लांजेवार, मुलगी अनघा चोपकर यांना याबाबत सांगून नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्याचे सांगितले. शोभा लांजेवार यांनी नेत्रदानाची माहिती देताच गीता लांजेवार व त्यांची मुलगी अनघा यांनी लगेच तयारी दर्शविली.
सुनील लांजेवार यांनी डॉ.सचिन बाळबुद्धे यांच्याशी संपर्क साधून नेत्रदानाबाबत त्यांना सांगितले. डॉ.बाळबुद्धे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रविशेखर धकाते यांना तुमसरातील नेत्रदानाची माहिती दिली. डॉ. धकाते यांनी भंडारा येथून नेत्रतज्ज्ञ डॉ.आगाशे व पथकाला तुमसर येथे रवाना केले. मृत्यूनंतर अवघ्या तीन तासात अनिल लांजेवार यांचे डोळे सुखरूप काढण्यात आले. वैद्यकीय नियमानुसार मृत्यूपश्चात सहा तासात डोळे काढावे लागतात. डोळे काढल्यानंतर ते भंडारा येथे नेण्यात आले. यात डॉक्टरांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
अंत्यसंस्कारानंतर मानवाचे सर्वच अवयव नष्ट होतात. मानवी अवयव गरजूंना मिळणे गरजेचे आहे. एका मानवाचे अवयव दुसºयाच्या कामी आले पाहिजे. ही उदात्त भावना जागृत होण्याची गरज आहे. स्नेह नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून नेत्रदान, किडनीदान, देहदान, यकृतदान हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
- सुनील लांजेवार, अध्यक्ष स्नेह नागरी पतसंस्था तुमसर.