शेतकऱ्यांची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:36 PM2018-09-15T22:36:48+5:302018-09-15T22:38:25+5:30
पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. २० दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. दरम्यान मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. २० दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. दरम्यान मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मृगाच्या प्रारंभी धो धो बरसलेल्या पावसाने ऐन हंगामात धोका दिला. त्यामुळे कधी मोटारपंपाच्या सहाय्याने तर कधी तलाव, बोड्यांमधून बादलीने पाणी देऊन पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून झाला. सद्यस्थितीत धानपिकाची ९० टक्के हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. त्यामुळे शेतकरी धिरावला असला तरी धान पूर्णपणे हाती येईपर्यंत पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस वेळोवेळी दगाफटका करीत असल्याने शेतकऱ्यांच्या मनातली भीती कायम आहे.
२० दिवसापूर्वी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मरणासन्न असलेल्या शेतपिकाला नवसंजीवनी मिळाली. आता हे पीक डौलाने उभे आहे. एवढेच नाही तर अंगातून घामाच्या धारा काढणाऱ्या उकाड्यापासूनही सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत. पावसाच्या दडीमुळे उकाड्यात वाढ झाली आहे. आठवडाभरापासून सकाळी ८ वाजतानंतर उकाड्यात प्रचंड वाढ होत आहे. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. पुन्हा कुलर्स, एसी, पंख्यांचा वापर होऊ लागला आहे.
मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मागील चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहेत. यावर्षी देखील पावसाचे प्रमाण अत्यल्प असून धरणे, नदी, नाले, बोड्या पाण्याचा साठा कमी आहे. शेतात डौलाने उभे असलेले पीक एका पाण्याने निसटण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता अधिक आहे.