अनोळखी मोबाईल नंबरने रोजगार सेवकाची फसवणूक; ४५ हजारांचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 05:48 PM2021-12-10T17:48:53+5:302021-12-10T17:56:20+5:30
रोजगार सेवक रंजित हारोडे यांना चक्क ४५ हजार रुपयांचा चुना लागला आहे. ॲपने अनोळखी मोबाईल नंबरवरून ही फसवणूक करण्यात आली आहे. स्मार्ट फोनमुळे ही फसवणूक झाली आहे.
रंजित चिंचखेडे
भंडारा : सायबर क्राईम फोफावल्याने ग्रामीण भागात नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. गोंदेखारी येथील रोजगार सेवक रंजित हारोडे यांना चक्क ४५ हजार रुपयांचा चुना लागला आहे. ॲपने अनोळखी मोबाईल नंबरवरून ही फसवणूक करण्यात आली आहे. स्मार्ट फोनमुळे ही फसवणूक झाली आहे.
लहान-मोठ्यापासून एकाच घरात अनेक स्मार्ट फोन आहेत. मोबाईलचे वेड लागल्यागत चित्र दिसून येत आहे. स्मार्ट फोनच्या माध्यमातून अनेक नागरिकांची फसवणूक झाली असल्याचे अनुभव येत आहेत. गोंदेखारी येथील रोजगार सेवक रंजित हारोडे यांच्याकडे ऑनलाइनची कामे करण्यात येत आहेत. याशिवाय मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी त्यांनी स्मार्ट फोन खरेदी केला आहे. बहुतांश सीमकार्डचे क्रमांक बँक खात्यासोबत जोडण्यात येत आहे.
रोजगारसेवक रंजित हारोडे यांचा चेतन नामक १५ वर्षीय मुलाच्या जवळ स्मार्ट फोन होता. ऑनलाइन शिक्षण घेत असताना एक मेसेज आला. या मेसेजमध्ये बचत खात्यात राशी जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. या ॲपद्वारे फसवणूक होणार असल्याचे चेतनच्या लक्षात आले नाही. स्मार्ट फोनवर आलेल्या ॲपवर अनोळखी मोबाईल नंबरवरून एक तरुण ॲपच्या संदर्भात माहिती देत होता. ॲपवर आलेली माहिती भरण्यास सांगत होता. अनोळखी तरुणावर चेतनने विश्वास ठेवत संपूर्ण माहिती ॲपवर दिली. या माहितीच्या आधारे बँक ऑफ इंडियाच्या बचत खात्यातून ४५ हजार रुपये लंपास झाल्याचे चेतनच्या लक्षात आले नाही.
सायंकाळी रोजगार सेवक रंजित हारोडे बाहेरून घरी आले असता चेतनने ही माहिती वडिलांना दिली. सायबर क्राईम अंतर्गत फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रंजित हारोडे यांनी डोक्यावर हात ठेवले. बँक खातेदारांना सायबर क्राईमच्या संदर्भात जनजागृतीची माहिती देत आहे. गत चार दिवसांपासून मात्र बचत खात्यात गेलेले पैसे परत आले नाही. यापूर्वी असाच प्रकार सिहोरा परिसरात घडला आहे.
मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण घेत असताना माझ्या मुलाला अनोळखी नंबरवरून तरुणाचा फोन आला. फसवणुकीची कल्पना नसताना मुलाने ॲपवर बचत खात्याची माहिती दिली असता ४५ हजार रुपयांची लूट करण्यात आली आहे. पालकांनी सावध झाले पाहिजे
रंजित हारोडे, रोजगार सेवक, गोंदेखारी