चुकीची रक्त तपासणी रुग्णांच्या जीवाशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 09:57 PM2019-03-20T21:57:38+5:302019-03-20T21:57:59+5:30
ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे महालेब्स अंतर्गत रुग्णांची मोफत रक्त तपासणी केली जाते, मात्र जो अहवाल देण्यात येतो तो पूर्णत: चुकीची मिळत आहे. त्यामुळे अनेकदा रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो.
सिराज शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे महालेब्स अंतर्गत रुग्णांची मोफत रक्त तपासणी केली जाते, मात्र जो अहवाल देण्यात येतो तो पूर्णत: चुकीची मिळत आहे. त्यामुळे अनेकदा रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. या चुकीच्या अहवालाने तर अनेकदा चांगल्या रुग्णांनाही भंडारा येथील सामान्य रुग्णालयात रेफर केल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्याने येथील जनतेत असंतोष आहे. चुकीच्या अहवालामुळे एखाद्या वेळी रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नि:शुल्क प्रयोग शाळा व चाचण्या निदान योजना ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे सुरू आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची रक्त तपासणी करण्यासाठी रक्ताचे नमुने पॅथालॅजिस्ट डॉ.हितेंद्र खांडेकर यांच्याकडे पाठविले जातात, मात्र त्यांच्याकडून आलेली रक्त तपासनीचा अहवाल पूर्णत: चुकीचा असतो. एखाद्या रुग्णांचा हिमोग्लोबिन बरोबर असतानाही कमी दाखविला जातो. 'प्लेटलेट' कधी जास्त, तर कधी कमी दाखविली जाते, यामुळे या रुग्णालयातील डॉक्टर गोंधळतात, परंतु याचा सर्वाधिक मनस्ताप रुग्ण व त्यांच्या कुटुंबावर होतो. काही रुग्णांना येथे रक्ताच्या प्लेटलेट चुकीच्या दर्शविण्यात आल्याने त्यांना नागपूर येथे दाखल करण्याची वेळ आल्याची घटना घडल्या आहेत.
मात्र याकडे जिल्हा चिकित्सकांचे लक्ष नाही. दोन दिवसांपूर्वी मोहाडी येथील रवींद्र शामराव पाटील यांच्या दोन वर्षाच्या मुलीला ताप येत असल्याने त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी केली. रक्त तपासण्याचा जो अहवाल आला त्याने त्यांचे धाबेच दणाणले. त्यात हिमोग्लोबिन ७.६ ग्रॅम आणि प्लेटलेट केवळ ०. ५४ लक्ष दर्शविण्यात आले होते. याशिवाय रक्ताच्या इतर चाचण्या चुकीच्या होत्या. त्यांनी आपल्या दोन वर्षाच्या मुलीला भंडारा येथे नेले व पुन्हा डॉ. हितेंद्र खांडेकर यांच्या खाजगी लॅब मध्ये रक्त तपासणी केली असता हिमोग्लोबिन १०.५ ग्रॅम आणि प्लेटलेट ३ लक्ष ९ हजार असल्याचा अहवाल प्राप्त झाला. एकाच डॉक्टरकडून दोन वेगवेगळा अहवाल कसा देण्यात आला, हे विचार करण्याजोगे आहे, मात्र रवींद्र पाटील यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे.
अव्यवस्थेकडे सर्वांचेच दुर्लक्ष
ग्रामीण रुग्णालयात शिक्षित व उच्च शिक्षित अधिकारी-कर्मचारी तसेच धनदांडगे व्यक्ती सहसा उपचारासाठी जात नाही. शेतकरी, शेतमजूर, गरीब व मध्यमवर्गीय रुग्ण उपचारासाठी तेथे अधिक जातात. त्यामुळेच ग्रामीण रुग्णालयातील अशा अव्यवस्थेकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देतात, ना जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी लक्ष देतात. त्यामुळेच येथील अव्यवस्था व कामचुकारपणावर कुणाचेही अंकुश नाही. गरिबांच्या जीवाशी खुलेआम खेळ सुरू आहे. हा प्रकार केव्हापर्यंत सुरू राहणार, हे एक कोडे आहे. अशाच कारणामुळे मग एखादेवेळी रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक कायदा हातात घेतल्याचे अनेक उदाहरणे समोर आले आहेत.