बीएसडब्लू सहाव्या सेमिस्टर परीक्षेत दिली भलतीच प्रश्नपत्रिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 10:47 AM2023-05-25T10:47:36+5:302023-05-25T11:06:46+5:30
पावणेतीन तासांनी मिळाली दुसरी उत्तरपत्रिका : त्यातही तब्बल २० पेक्षा अधिक चुका
भंडारा : बीएसडब्ल्यूच्या सहाव्या सेमिस्टरच्या मराठी विषयाच्या परीक्षेत येथील प्रगती महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर चुकीची प्रश्नपत्रिका देण्याचा प्रकार घडला. हा प्रकार लक्षात आल्यावर विद्यार्थ्यांनी तक्रार केली. त्यानंतर अर्ध्या तासाने प्रश्नपत्रिका बदलून देण्यात आली. मात्र, नव्याने दिलेल्या प्रश्नपत्रिकेतही २० ते २२ चुका होत्या. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून उन्हाळी परीक्षा सुरू आहे. बीएसडब्ल्यूच्या सहाव्या सेमिस्टरच्या मराठी विषयाचा पेपर बुधवारी सकाळी ९:३० ते १२:३० या वेळेत होता. भंडारा येथील प्रगती महाविद्यालयाच्या केंद्रावर वेळेत पेपर सुरू झाला. मात्र, अभ्यासक्रमाच्या बाहेरची प्रश्नपत्रिका हाती पडली. त्यानंतर ही प्रश्नपत्रिका रद्द करून तब्बल पाऊणेतीन तासांनी नव्याने प्रश्नपत्रिका देण्यात आली. मात्र, त्यातही चुकाच होत्या. विद्यापीठाच्या गलथानपणामुळे नुकसान होण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकाराच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती नेमून दोषींवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी नागपूर विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी केली आहे. चुकीच्या प्रश्नांना सरसकट पूर्ण मार्क देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
नव्याने देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेतही अनेक चुका
तब्बल पाऊणेतीन तासांनी नव्याने देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेतही अनेक चुका होत्या. प्रश्न क्रमांक १ व ३ या प्रश्नातच चुका आहेत. प्रश्नपत्रिकेतील भाषासुद्धा विद्यार्थ्यांना कळण्यापलीकडची असल्याने अनेकांचा गोंधळ उडाला. मराठी विषयाचा पेपर असतानाही प्रश्नपत्रिकेत व्याकरणाच्या अनेक चुका आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आपल्या स्थापनेची शंभर वर्षे पूर्ण करून शतक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. मात्र, झालेला गलथानपणा विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला शोभणारा नाही. विद्यापीठाच्या प्रशासकीय व्यवस्थेवर गालबोट लावणाऱ्या या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात यावी.
- प्रवीण उदापुरे, माजी सिनेट सदस्य