दहावीचा निकाल ९९.३४ टक्के, पण आनंद हिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:27 AM2021-07-17T04:27:35+5:302021-07-17T04:27:35+5:30
भंडारा जिल्ह्यातून नऊ हजार ६८ मुले आणि आठ हजार ११ मुली परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी आठ हजार ९९५ ...
भंडारा जिल्ह्यातून नऊ हजार ६८ मुले आणि आठ हजार ११ मुली परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी आठ हजार ९९५ मुले आणि सात हजार ९७२ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.१९, तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.५१ टक्के आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र दिसून आले.
कोरोना संसर्गामुळे परीक्षेविना विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचा आनंद असला तरी निकालाच्या दिवशी गुरुवारी, मात्र शिक्षण मंडळाचे संकेतस्थळ क्रॅश झाल्याचे दिसून आले. दुपारी १ वाजतापासून विद्यार्थी आणि पालक संकेतस्थळावर आपला रिझल्ट पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र प्रयत्न करूनही संकेतस्थळ उघडले जात नव्हते. सायंकाळपर्यंतही तीच स्थिती होती. आपण पास तर झालो, परंतु किती गुण मिळाले हे कळू शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकालाचा आनंद हिरावून घेतला. शाळानिहाय निकालही कळू शकला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक गुण घेणारा विद्यार्थी कोण याची माहिती मिळू शकली नाही. विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह अनेकांना संकेतस्थळ का उघडले जात नाही याची माहिती घेत होते. परंतु कुणाकडेही त्याचे योग्य उत्तर नव्हते.
बॉक्स
पाच हजार ९६ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत
उत्तीर्ण झालेल्या १६ हजार ९६७ विद्यार्थ्यांपैकी पाच हजार ९६ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत, तर प्रथम श्रेणीत आठ हजार ४४४, तर द्वितीय श्रेणीत दोन हजार ८९८ आणि पास श्रेणीत ५२९ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. प्रथम आणि प्रावीण्यश्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा मोठी आहे. उत्तीर्ण झालेल्या ५०० पुनर्परीक्षार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाला नाही. प्रथम श्रेणीत सहा, द्वितीय श्रेणीत १५ आणि सर्वाधिक ४७९ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
बॉक्स
ना कौतुक, ना अभिनंदन
शैक्षणिक जीवनातील दहावीची परीक्षा महत्त्वाची माणली जाते. विद्यार्थ्यांसाठी ही पहिलीच बोर्डाची परीक्षा असते. वर्षभर अभ्यास केल्यानंतर निकालाच्या दिवशी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले जाते. नातेवाइकांसह शाळा आणि सामाजिक संस्था विद्यार्थ्यांच्या कौतुकाचे सोहळे घेतात. परंतु शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालानंतर ना कुठे कौतुक दिसले, ना अभिनंदनाचा वर्षाव. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यालाच आपल्याला किती गुण मिळाले हे आपल्याला उशिरापर्यंत कळतेच नव्हते.