वडिलांचा मृतदेह घरात, मुलीने दिली बारावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 01:07 AM2020-02-22T01:07:55+5:302020-02-22T01:08:33+5:30
रेशमा हिरामण वरकडे ही कारधा येथील शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालयात बारावीमध्ये शिकत आहे. वर्षभर बारावीचा अभ्यास केला. घरात वडिलांचे आजारपण असतानाही तिने मन लावून अभ्यास केला. वडिलही तिला अभ्यासासाठी सातत्याने प्रोत्साहित करीत होते. मात्र ऐन परीक्षेच्या काळात वडिलांची प्रकृती आणखी बिघडली.
दिनेश रामटेके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव (दिघोरी) : आजाराने वडिलांचा मृत्यू झाला. दुसरीकडे बारावीचा पेपर. संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना एका विद्यार्थीनीने वडिलांच्या मृत्यूचे दु:ख हृदयात ठेवत बारावीचा पेपर दिला. पेपर सोडविल्यानंतर आपल्या लाडक्या लेकीला अखेरचा निरोप दिला. ही घटना आहे भंडारा तालुक्यातील दिघोरी येथील.
रेशमा हिरामण वरकडे ही कारधा येथील शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालयात बारावीमध्ये शिकत आहे. वर्षभर बारावीचा अभ्यास केला. घरात वडिलांचे आजारपण असतानाही तिने मन लावून अभ्यास केला. वडिलही तिला अभ्यासासाठी सातत्याने प्रोत्साहित करीत होते. मात्र ऐन परीक्षेच्या काळात वडिलांची प्रकृती आणखी बिघडली. अशातच गुरूवारी सकाळी वडील हिरामण टिकाराम वरकडे (५४) यांचे निधन झाले. त्याच दिवशी रेशमाचा बारावीचा मराठीचा पेपर होता. संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. वडिलांचा मृतदेह घरात असताना तिने जड अंतकरणाने बारावीचा पेपर देण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांनी याला प्रोत्साहन दिले. ती आपल्या लाडक्या पित्याच्या मृतदेहाचे दर्शन घेवून कारधा येथील प्रकाश हायस्कूलमध्ये बारावीचा पेपर देण्यासाठी गेली. दु:ख बाजूला सारत तिने बारावीचा पेपर सोडविला. पेपर सोडवून आल्यानंतर तिने आपल्या पित्याला अखेरचा निरोप दिला.
जड अंतकरणाने अखेरचा निरोप
बारावीचा मराठीचा पेपर सोडवून आल्यानंतर रेशमाने आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. हिरामण वरकडे कारधा येथील एका सोयाबीन कंपनीत कामाला होते. मात्र गत काही दिवसांपासून आजारी होते. या आजारातच त्यांचा मृत्यू झाला. हिरामण वरकडे यांच्या मागे पत्नी, चार मुली आहेत.