किटाडीच्या दिव्यांग योगेश्वरची क्रीडा क्षेत्रात उत्तुंग झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:17 PM2018-12-02T22:17:04+5:302018-12-02T22:17:22+5:30
जिद्द आणि चिकाटीचे फळ : राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत ४८ पदके देवानंद नंदेश्वर। लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : पोलीओमुळे लहानपणीच ...
जिद्द आणि चिकाटीचे फळ : राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत ४८ पदके
देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पोलीओमुळे लहानपणीच अपंगत्व आलं. खेडेगावात मार्गदर्शनाचाही अभाव. मात्र आतील खेडाळू त्याला स्वस्थ बसु देत नव्हता. जिद्द, चिकाटीच्या बळावर राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत एक - दोन नव्हे तर तब्बल ४८ पदक पटकाविली. भालाफेक, थाळीफेक आणि गोळाफेक स्पर्धेत आपल्या गावाचे नाव सुवर्णाक्षरात कोरले. हा आहे लाखनी तालुक्यातील किटाडी बाजार येथील दिव्यांग योगेश रवींद्र घाटबांधे.
अडीच हजार लोकवस्तीच्या किटाडीत योगेश राहतो. लहानपणीच त्याला पोलिओमुळे अपंगत्व आलं. पंरतु यासर्व विपरीत परिस्थितीवर मात करीत त्याने खेळण्याची जिद्द सोडली नाही. योगेश्वरने आतापर्यंत ४८ पदक पटकाविली असून त्यात १८ सुवर्ण, १६ रोप्य आणि १४ कास्य पदकांचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अपंगाच्या १४ व्या वरिष्ठ आणि ८व्या कनिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत त्याने एफ ५६ गटात भालाफेक, थालीफेक आणि गोळाफेक मध्ये कांस्य पदक पटकाविले. कोल्हापुरच्या राज्यस्तरीय अपंग स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन रजत पदके पटकावून त्याने जिल्ह्याची मान उंचाविली.
योगेश्वरला नागपूर येथील विरजा अपंग प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्ष दिव्यांग रेणुका बिडकर यांच्याकडून प्रेरणा मिळाली. आणि त्यांच्यामुळेच पहिली संधी मिळाली. चार आंतरराष्टÑीय, सहा राष्टÑीय, १६ राज्यस्तरीय स्पर्धेत तो आतापर्यंत सहभागी झाला आहे.
बंग्लोर, चंदीगढ, गजीयाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तो सहभागी झाला. उत्तरप्रदेशातील पॅराअॅथेलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत त्याने महाराष्ट्राचे कर्णधारपद भुषविले. दिव्यांगत्वावर मात करुन त्याने खेळात यश मिळविले. यासोबतच तो सामाजिक उपक्रमातही हिरीरीने भाग घेतो. भंडारा जिल्हा पाणलोट समितीचा जिल्हाध्यक्ष आहे.
किटाडीच्या ग्राम दक्षता समितीचा सदस्य असून ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा, स्वच्छता, पर्यावरण समितीतही त्यानी उल्लेखनीय कार्य केले आहे. योगेश्वरने इतिहास आणि मराठी या विषयात एम.ए. केले असून एम.एड. झाले आहे.
सध्या तो किटाडी येथे एका कनिष्ठ महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. पॅराआॅलम्पिक स्पर्धेत भारताच प्रतिनिधित्व करुन सुवर्ण पदक मिळवून देण्याची त्याची अपेक्षा आहे. स्वत:ला दुर्बळ समजू नका, मनात जिद्द असेल तर जगात कोणतीच गोष्ट शक्य नाही, असे योगेश्वर घाटबांधे यांनी जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने सांगितले.
विविध पुरस्कारांनी गौरव
योगेश्वर घाटबांधे याला आतापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात २०११-१२ मध्ये जिल्हा क्रीडा विशेष खेळाडू पुरस्कार, उत्कृष्ठ क्रिकेट समालोचक राज्य पुरस्कार, राष्ट्रीय सेवा योजना विद्यापिठस्तरीय बेस्ट ग्रुप लीडर पुरस्कार, आणि २०१८ साली क्रीडा गौरव पुरस्कार मिळाला.