हिरव्या हरभऱ्यातून एकरी ४० हजाराचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:55 AM2021-01-08T05:55:10+5:302021-01-08T05:55:10+5:30
लाखनी तालुक्यात हरभऱ्याचे उत्पन्न काही प्रमाणात घेतले जाते. पालांदूर कृषी मंडळ कार्यालयांतर्गत ५०० हेक्टरवर हरभऱ्याची लागवड करण्यात आली. अतिशय ...
लाखनी तालुक्यात हरभऱ्याचे उत्पन्न काही प्रमाणात घेतले जाते. पालांदूर कृषी मंडळ कार्यालयांतर्गत ५०० हेक्टरवर हरभऱ्याची लागवड करण्यात आली. अतिशय कमी पाण्यात हरभऱ्याचे पीक हाती येते. जमिनीची सुपिकता टिकविण्यातही मोलाची मदत होते. यातूनच ढिवरखेडा येथील शेतकरी रामभाऊ सखाराम थेर यांनी आपल्या शेतात हरभऱ्याची लागवड केली. योग्य नियोजन आणि काटकसरीने पाण्याचा वापर करीत त्यांच्या शेतात हरभरा फुलून आला. हिरवे घाटे दिसू लागले. या हिरव्या हरभऱ्याला बाजारात मागणी वाढली आहे. त्यामुळे त्यांनी हिरवा हरभरा विकण्याचा निश्चय केला. आता त्यांना एकरी ४० हजार रुपये उत्पन्न आले आहे. त्यांच्याकडे साडेतीन एकर शेती असून दोन हंगामात धान घेतला जातो. मधल्या काळात १०० ते १२० दिवसाचे नगदी पीक घेतले जाते. हरभऱ्याला अधिक मागणी असल्याने यंदा लागवड करण्यात आली. १५ ते २० रुपये किलो दराने हरभरा विकला गेला. ग्रामीण भागात १० रुपये जुडीप्रमाणे विक्री करण्यात आली. काही व्यापाऱ्यांनी थेट शेतावरुनच हिरवा हरभरा विकत घेतला.
बाॅक्स
तीन हंगामाचे नियोजन
शेतकरी रामभाऊ थेर आपल्या शेतात धानाचे पीक घेतात. रबी आणि खरीप हंगामात धान घेतला जातो. परंतु मधातल्या काळात शेती रिकामी राहते. याचा योग्य उपयोग करण्यासाठी त्यांनी हरभऱ्याची लागवड केली. दोन हंगामाच्या मधात हरभऱ्याची लागवड केली. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात ते तिन्ही हंगामाचे नियोजन करीत असून सलग तिसऱ्या वर्षी त्यांना चांगले उत्पन्न आले आहे.