योग प्राणायाम भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:23 AM2021-06-22T04:23:57+5:302021-06-22T04:23:57+5:30
डमदेव कहालकर : मिरेगाव येथे योग दिवस उत्साहात भंडारा : भारत हा साधुसंतांचा व संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक असा देश ...
डमदेव कहालकर : मिरेगाव येथे योग दिवस उत्साहात भंडारा : भारत हा साधुसंतांचा व संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक असा देश आहे. योग व साधनेच्या माध्यमातून ऋषिमुनींनी अनेक असाध्य बाबी साध्य करून दाखविले आहे. प्राणायाम ही भारतीय संस्कृतीची आपल्याला मिळालेली अमूल्य देणगी आहे, असे प्रतिपादन आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक डमदेव कहालकर यांनी केले. लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आयोजित योग दिनाच्या उपक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सहायक शिक्षक पालिकचंद बिसने, चंद्रशेखर कापगते, कोमल धुर्वे यांसह अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. या शाळेच्या वैविध्यपूर्ण उपक्रमाची महती राज्यभर पसरली आहे. याशिवाय शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्थेच्या पुढाकाराने व शाळेच्या हस्तक्षेपाने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
मुख्याध्यापक डमदेव कहालकर म्हणाले, ‘‘राष्ट्र निर्माण अंतर्गत अंगात सामर्थ्य असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सकारात्मक ऊर्जा अंगी यावी, यासाठी योग व प्राणायामाचे धडे गिरविले पाहिजे. शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्था खराशीच्यावतीने असे अनेक जागरात्मक कार्यक्रम राबविले जात आहेत. युवकांना योग व साधनेच्या माध्यमातून शक्तिशाली राष्ट्र निर्माण करण्याकरिता प्रेरित केले पाहिजे. योग व प्राणायाम यांच्या माध्यमातून ऊर्जेच्या सकारात्मक वापर सामाजिक कार्यासाठी करावा, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन पालिकचंद बिसने यांनी तर आभार कोमल धुर्वे यांनी मानले.