नियतीपुढे जिंकले योगेश्वरचे कर्तृत्व

By admin | Published: December 3, 2015 12:44 AM2015-12-03T00:44:10+5:302015-12-03T00:44:10+5:30

मनुष्याच्या जीवनात कितीही संकट आले, तरीही त्यावर मात करण्याचा दृढ संकल्प मनात ठेवला तर ती लिलया पार करता येतात.

Yogeshwar's achievement in front of destiny | नियतीपुढे जिंकले योगेश्वरचे कर्तृत्व

नियतीपुढे जिंकले योगेश्वरचे कर्तृत्व

Next

अपंग खेळाडूची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत छाप : पदक जिंकूनही जगतोय उपेक्षिताचे जीवन
प्रशांत देसाई भंडारा
लहरो से डरकर नैया पार नहीं होती !
कोशिश करने वालों की हार नहीं होती !!
मनुष्याच्या जीवनात कितीही संकट आले, तरीही त्यावर मात करण्याचा दृढ संकल्प मनात ठेवला तर ती लिलया पार करता येतात. वरील ओळींचा अर्थाची खुणगाठ बांधून त्यांना प्रत्यक्ष जीवनात उतरवून डोंगराएवढ्या समस्यांवर मात करून योगेश्वर रविंद्र घाटबांधे या अपंग युवकाने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
योगेश्वर घाटबांधे याने, पोलीओमुळे अपंगत्व असतानाही त्यामुळे खचून न जाता किंवा कुठल्याही परिस्थितीची तमा न बाळगता खेळात दैदिप्यमान यश मिळविले. केवळ खेळायचे म्हणून तो खेळला नाही, तर त्यातून मिळविलेल्या यशातून त्याला जगण्याची नवी उमेद मिळाली, सोबतच समाजासाठी प्रेरणादायी ठरला. योगेश्वरने तालुका, जिल्हा नाही तर चक्क आंतरराष्ट्रीय खेळात आपल्या खेळाचा ठसा उमटविला. एक-दोन नाही तर चार वेळेस योगेश्वरने आंतरराष्ट्रीय खेळात भारताचे प्रतिनिधित्व करून पदक मिळवित स्वत:चे नाव आंतरराष्ट्रीय पटलावर कोरले.
लाखनी तालुक्यातील जेमतेम २,३०० लोकसंख्या असलेल्या किटाळी गावात योगेश्वरचा जन्म अल्पभूधारक शेतकरी रविंद्र घाटबांधे यांच्या घरी झाला. सर्वसामान्य कुटुंबातील योगेश्वरला पोलीओ डोज पाजण्यात न आल्याने त्याच्यावर नियतिने अपंगत्व लादले. शिक्षणात तल्लख बुध्दीमत्ता लाभलेल्या योगेश्वरची खेळात आवड होती. मात्र, अपंगत्वाने त्याचे खेळण्याबाळगण्याचे दिवस हिरावले. दिवसामागून दिवस गेले, तसे त्याने इतिहास व मराठी या दोन विषयात एम.ए. व एम.एड. हे अभ्यासक्रम पूर्ण केले. अभ्यासासोबतच त्याला क्रीडाक्षेत्रात नाव कोरण्याची प्रगल्भ इच्छा असतानाही तो नियतीपुढे हतबल होता. खेळाची मनात जीद्द असल्याने तो नागपूर येथील विरजा अपंग संस्थेच्या संपर्कात आला. तिथे त्याला मिळालेल्या मार्गदर्शनावर जीवनात कुठल्याही प्रकारच्या स्थानिक खेळात सहभाग न घेताही त्याने २००७ मध्ये प्रथमच चेन्नई येथे आंतरराष्ट्रीय पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. यानंतर त्याने कधीही मागे वळून बघितले नाही. दरम्यान, त्याला प्रशिक्षक किंवा भौतिक सुविधांच्या अभावाचा सामना करत उत्तरोत्तर खेळात स्वत:ला सिध्द केले.
महाभारतातील एकलव्याने द्रोणाचार्यकडून प्रशिक्षण न घेताही स्वत:ला धनूर्विद्येत निपूण बनविले, तसाच योगेश्वर हा आधुनिक एकलव्य ठरला. योगेश्वरच्या जीवनात नियतीने अपंगत्व लादून त्याच्यावर नियतीने आघात केला. मात्र, मेहनत व जिद्दीच्या जोरावर त्याने अपंगत्वावर मात करून कर्तृत्वाने नाव कमविल्याने 'कोन कहता है आसमान में सुराग नहीं होता! एक पत्थर तो तबीयत से उछाला
यारो!! असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

१६ स्पर्धेत मिळविले ३२ पदक
खेळात रूची असतानाही केवळ अपंगत्वामुळे त्याला खेळात अडचणी निर्माण होत होत्या. अशा योगेश्वरने जिद्दीच्या बळावर १६ पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा खेळून ३२ पदक जिंकले. यात १२ सुवर्ण, १३ रौप्य व ७ कास्य पदकांचा समावेश आहे. चार आंतरराष्ट्रीय, तीन राष्ट्रीय व नऊ राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने प्रतिनिधीत्व केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चेन्नई (२००७), चंदीगड (२०१०), बंगलोर (२०१३) व गाझीयाबाद (२०१५) येथे त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले. बंगलोर येथील स्पर्धेत त्याने भारतासाठी पहिले पदक जिंकून देत पदकांची सुरूवात करून दिली, हे विशेष.

आंतरराष्ट्रीय खेळाडूची उपेक्षा

खेळात पदक जिंकून देणाऱ्या या खेळाडूला साधे प्रशिक्षक तर सोडाच साहित्य, भौतीक सुविधाही देण्यात सरकारने पुढाकार घेवू नये, एवढा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. उच्च शिक्षित योगेश्वर नोकरी व पुरस्कारासाठी शासनाचे उंबरठे झिजवीत आहे. मात्र, शासनाने त्याची साधी दखल घेतलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्षितीजावर नाव कोरलेल्या योगेश्वरला स्थानिक प्रशासनाकडूनही दुर्लक्षीत करण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी तीन वेळेस कागदपत्र सादर केलीत परंतू त्याला डावलण्यात आले. एमएड प्रवेशाच्या वेळेस खेळाडूच्या राखीव जागेवर त्याला डावलून सुदृढ महिलेला घेण्यात आले.

Web Title: Yogeshwar's achievement in front of destiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.