तुमसरात शासकीय जमिनीवर अतिक्रमण
By admin | Published: May 8, 2016 12:26 AM2016-05-08T00:26:39+5:302016-05-08T00:26:39+5:30
तुमसर नगरपरिषदेच्या सीमेत शासकीय भूखंडावर नियमबाह्य अतिक्रमण करणे सुरू आहे ...
दोषीवर कारवाईची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांसह नगरविकास, महसूल मंत्र्यांकडे तक्रार
तुमसर : तुमसर नगरपरिषदेच्या सीमेत शासकीय भूखंडावर नियमबाह्य अतिक्रमण करणे सुरू आहे ही अतिक्रमण हटवून अतिक्रमण धारकावर कायदेशीर कारवाई करण्याची लेखी तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसोबतच सदर तक्रारींच्या प्रति मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, महसूलमंत्री, तहसीलदार यांचेकडेही पाठविलेल्या आहेत. तक्रारीत नमूद केले आहे की, तुमसर शहरात शासनाची शासकीय जागा राखीव ठेवलेली आहे. ही शासकीय जागा गरजू, गरीब लोकांना कायदेशिरपणे लिजवर देण्यात आली असून शासनाला याचा महसूल सुद्धा मिळत आहे.
तुमसर बसस्थानकाच्या मागील भागात नगररचनाकार खात्यामार्फत ५० फूटाच्या रस्त्याकरिता जागा राखीव ठेवलेली आहे. या जागेवर नगरपरिषदेने २० फूटाचा सिमेंट रस्ता तयार केला. ३० फूट जागा तिथे शिल्लक आहे. शिल्लक जागेवर रामदास राणा रा. तुमसर यांनी बेकायदेशिरपणे अतिक्रमण करून पक्के बांधकाम करून पतंजलीची दुकान लावलेली आहे. त्यानंतर इतरांनी नगरपरिषद मुख्याधिकारी चंद्रशेखर गुन्हाने व नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांच्याशी संगनमत करून बेकायदेशिर शासकीय जागेवर अतिक्रमण करून ११ खोल्यांचे बांधकाम सुरू केले आहे. या अतिक्रमणाबद्दल नगरपरिषदेकडे तक्रार करूनही कोणतीच कायदेशिर कारवाई केली नाही. उलट अतिक्रमणधारकांना संरक्षण देत आहे.
महाराष्ट्र जमिन महसूल कायद्याचे कलम ५० ते ५४ ची कोणतीच पूर्तता न करता अतिक्रमण धारक शासकीय जागा दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही जागा अतिक्रमणधारकांना आवंटीत करण्यात आली नाही किंवा त्याबाबत जाहीर नोटीस सुद्धा प्रकाशित झालेली नाही. त्यामुळे नियमबाह्य येथे अतिक्रमण केलेले आहे. मौका चौकशी करून बेकायदेशिरपणे अतिक्रमण केलेल्या व्यक्तीविरूद्ध कायदेशिर कारवाई करून त्यांचे विरूद्ध गुन्हा नोंद करून अतिक्रमण काढण्यात यावे. अतिक्रमण केलेली जागा मौल्यवान असून येथून गेलेला रस्ता तुमसर-हसारा रस्त्याला जोडलेला असून रहदारीचा आहे. अतिक्रमणधारक बांधकाम करण्यात यशस्वी झाले तर येथील रहदारीस अडथडे निर्माण होईल तथा नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊन इतर लोकं सुद्धा शासकीय जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतील. शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्यांचे अतिक्रमण काढून कायदेशिर कारवाईची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
तुमसर शहर अतिक्रमणावरच आहे. नगरपरिषद अतिक्रमण करणाऱ्यांच्या नहेमीच विरोधात आहे. अतिक्रमणधारकांना नगरपरिषदेने कायदेशिर नोटीसा दिल्या असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव नगरपरिषदेने घेतला आहे. राजकीय हेतूने आरोप करणाऱ्यांनी स्वत: किती नियमात कामे करतात ते पहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांना विरोधात मोहिम सुरू करण्याची गरज आहे.
-अभिषेक कारेमोरे, नगराध्यक्ष न.प. तुमसर.