भंडारा जिल्ह्यात पासपोर्टसाठी करावे लागत आहे ३० दिवसापर्यंतचे वेटिंग !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 02:10 PM2024-07-01T14:10:39+5:302024-07-01T14:11:12+5:30

Bhandara : विदेशात जाण्याआधी करा तयारी; डाक कार्यालयात स्वतंत्र विभाग

You have to wait up to 30 days for a passport! | भंडारा जिल्ह्यात पासपोर्टसाठी करावे लागत आहे ३० दिवसापर्यंतचे वेटिंग !

You have to wait up to 30 days for a passport!

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
विदेशात जाण्यासाठी पासपोर्ट हा महत्त्वाचा दस्तावेज आहे. व्हिसा काढायचा असल्यास पासपोर्ट हा अत्यंत गरजेचा आहे. पासपोर्ट नसल्यास व्हिसासुद्धा मिळत नाही. मात्र, पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तो मिळविण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना २६ ते ३० दिवसांची वाट पाहावी लागत आहे.


विदेशात जाण्याचे नियोजन असेल, तर अगोदरच पासपोर्टसाठी अर्ज केलेला बरा, असेच नागरिकांना म्हणावे लागत आहे. पासपोर्ट म्हणजे पारपत्र, आपल्या देशाने दुसऱ्या देशात जाण्यासाठी दिलेली परवानगी, काही अटी व शर्तीवरही परवानगी दिली जाते. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे यासाठी अर्ज करावा लागतो. आता ही सुविधा भंडारा शहरातील जिल्हा डाक कार्यालयातही उपलब्ध आहे.


ऑनलाइन अर्ज केल्यानंतर जिल्हा डाक कार्यालयातील पासपोर्ट काउंटरवर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलवले जाते. दर दिवशी जवळपास २५ दिवसांत २५ जणांच्या कागदपत्रांची तपासणी या पासपोर्ट काउंटरवर करण्यात येते. त्यामुळे नागरिकांना विदेशात जाण्यासाठी पासपोर्ट हा महत्त्वाचा दस्तऐवज असला, तरी त्यासाठी १८ ते २० दिवसांची वाट पाहावी लागत आहे.


गुन्ह्याची होते तपासणी
• डाक कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ही कागदपत्रे पुणे कार्यालयात स्कॅन करून पाठविली जातात. त्यानंतर संबंधित नागरिकांच्या परिसरातील पोलिस ठाण्याकडून रेकॉर्ड मागविला जातो.
• संबंधित व्यक्तीला पोलिस ठाण्यामध्ये बोलावून त्याच्याविरोधात काही गुन्हा दाखल आहे का? याची तपासणी केली जाते.


अर्ज कसा कराल
• पासपोर्टसाठी या विभागाच्या संकेतस्थळावर माहिती भरून अर्ज करता येतो. त्यावर मिळणारा आयडी घेऊन जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस कार्यालयात जावे लागते. त्यासाठी त्या ठिकाणी कागदपत्रांची तपासणी केली जाते.


शुल्क किती?
• पासपोर्ट साधारणपणे ३० दिवसाच्या आतमध्ये उपलब्ध होतो. मात्र, तत्काळ म्हणजेच सात दिवसांच्या कालावधीमध्ये पासपोर्ट आवश्यक असल्यास
त्यासाठी जवळपास १५०० रुपये शुल्क आकारले जाते.
• वय ६० पेक्षा अधिक असल्यास १३५० रुपये एवढे शुल्क आकारले जाते. यासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागते.


ही कागदपत्रे लागतात
• पासपोर्ट काढण्यासाठी आधारकार्ड, जन्म तारखेचा दाखला, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, महिलांकरिता लग्नाचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे लागतात.


डाक कार्यालयात स्वतंत्र काउंटर
• पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी जिल्हाभरातून नागरिक भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरात असलेल्या डाक कार्यालयात येतात. या कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याठिकाणी अर्जदारांना विशेष सहकार्याची भूमिका कर्मचाऱ्यांची असते.
 

Web Title: You have to wait up to 30 days for a passport!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.