तुमसरेंने वाचविले आकाशचे प्राण
By admin | Published: May 28, 2016 12:32 AM2016-05-28T00:32:57+5:302016-05-28T00:32:57+5:30
अचानकपणे सुरु झालेल्या वादळवारा व गारपिटीसह पावसाने सुरुवात केली. यात प्रत्येकजण आपआपल्या जीव वाचण्यासाठी आसरा घेत होते.
संजय साठवणे साकोली
अचानकपणे सुरु झालेल्या वादळवारा व गारपिटीसह पावसाने सुरुवात केली. यात प्रत्येकजण आपआपल्या जीव वाचण्यासाठी आसरा घेत होते. त्याचवेळी आवाज आला वाचवा वाचवा अन् डॉ. अजय तुमसरे व त्यांचे वडील सेवानिवृत्त वनक्षेत्राधिकारी व मानव धर्माचे मार्गदर्शक देवराम तुमसरे यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लाकडी पानठेल्याखाली दबलेल्या आकाशला वाचविण्यासाठी आले व आकाशला जीवदान दिले.
शुक्रवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसाने साकोलीत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे प्रत्येकजण जीव वाचविण्यासाठी घर किंवा झाडाचा आसरा घेत होता. आकाश वाघाडे हा १६ वर्षीय तरुण बाजारातून घरी येत असताना अचानक तोही या वादळात सापडला म्हणून त्याने एका झाडाखाली आसरा घेतला. मात्र वादळ एवढे जोरदार होते की, या वादळामुळे झाड पडले व या झाडामुळे पानठेलाही पडला. यात आकाश वाघाडे पूर्णपणे दबला.
दरम्यान, यावेळी डॉ. तुमसरे, त्यांचे वडील यांनी दवाखान्यातील काही कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळावर आले व त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गारपीट, वादळवाऱ्यात व पावसात शर्तीचे प्रयत्न करुन आकाशला काढून त्यांचेवर औषधोपचार केला व आकाशला जीवदान दिले.